Saif Ali Khan Attack Lawrence Bishnoi Connection : आज सकाळी मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला आबे. यानंतर या प्रकरणी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत, “देशातील लोकांचे रक्षण करण्यात भाजपा अपयशी ठरत आहे. गुजरातच्या तुरुंगात बसलेला एक गुंड निर्भयपणे गुन्हे करत आहे. असे दिसते की, त्याला संरक्षण दिले जात आहे,” अशी टीका केली आहे.
दरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद आहे. गेल्या काही काळात मुंबईत सलमान खानच्या घराबाहेर झालेला गोळीबार आणि बाब सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये त्याचे कनेक्शन समोर आले होते.
पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “एवढ्या सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या इतक्या मोठ्या अभिनेत्यावर त्याच्याच घरात हल्ला होणे ही चिंतेची बाब आहे. यामुळे राज्य आणि केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. यापूर्वी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. नंतर राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती. जर सरकार इतक्या मोठ्या सेलिब्रिटींना सुरक्षा देऊ शकत नसेल तर सामान्य लोकांचे काय? डबल इंजिन सरकार ना सुशासन देऊ शकते ना लोकांना सुरक्षा.”
अभिनेता सैफ अली खानवर आज सकाळी त्याच्या राहत्या घरी हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सैफ अली खान त्याच्या घरी असताना घरात अचानक एक अज्ञात व्यक्ती शिरला आणि त्याने सैफवर चाकू हल्ला केला. या घटनेत सैफ अली खानला सहा जखमा झाल्या. त्यानंतर सैफ अली खानला तातडीने वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
हल्ला झाल्यानंतर मध्यरात्री सैफचा मोठा मुलगा इब्राहिम अली खानने त्याला लीलावती रुग्णालयात दाखल केले. त्यानुसार, त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे त्याची प्रकृती आता स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाचे डॉ. नितीन डांगे यांनी आज माध्यमांना दिली.