दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने भारताची बॅडमिंटनपूट सायना नेहवालवर केलेल्या टीकेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सिद्धार्थने सायना नेहवालवर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. यावरुन संताप व्यक्त केला जात असून महिला आयागानेही याची दखल घेत सिद्धार्थला नोटीस पाठवली आहे. यादरम्यान सायना नेहवालचे वडील हरवीर सिंह नेहवाल यांनीदेखील टाइम्स नाऊशी बोलताना संताप व्यक्त केला आहे. “माझ्या मुलीने देशासाठी मेडल जिंकले आहेत, त्याचं देशासाठी काय योगदान आहे?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे.
“माझ्या मुलीसाठी अशा प्रकारचे शब्द वापरल्याने मला खूप वाईट वाटलं. त्याने देशासाठी काय केलं आहे? तिने देशासाठी पदकं जिंकली आहेत, देशाला गौरव मिळवून दिला आहे,” असं ते म्हणाले आहेत.
“भारत एक महान समाज आहे असं मी नेहमीच मानत आलो आहे. सायनाला पत्रकार आणि क्रीडा बंधूंचा पाठिंबा आहे कारण एका खेळाडूला किती संघर्ष करावा लागतो हे त्यांना माहित आहे.” असं यावेळी त्यांनी सांगितलं.
“तुझे मत व्यक्त करणे आमच्यासाठी…”; अभिनेता सिद्धार्थने केलेल्या टिकेवर सायनाच्या पतीची प्रतिक्रिया
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राच्या डीजीपीला पत्र लिहिलं असून सिद्धार्थविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. सायनाच्या वडिलांनी महिला आयोगाने घेतलेल्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. “महिला आयोगाने दखल घेतल्याचा आम्हाला आनंद आहे. सिद्धार्थने माफी मागितली पाहिजे. मी त्याला ओळखतही नाही, पहिल्यांदाच त्याच्याबद्दल ऐकलं आहे,” असं सायनाच्या वडिलांनी म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय आहे –
बॉलिवूड आणि अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता सिद्धार्थने स्टार सायना नेहवालवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने हा वाद सुरु झाला आहे. हे प्रकरण इतके टोकाला गेले आहे की, राष्ट्रीय महिला आयोगाने सिद्धार्थविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
झालं असं की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींसंबंधी ट्वीट करताना सायना नेहवालने “कोणतेही राष्ट्र स्वत:च्या पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड करत असेल तर ते सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. मी अराजकवाद्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करते,” असं म्हटलं होतं. सायना नेहवाल भाजपाची सदस्यदेखील आहे.
सायना नेहवालच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना सिद्धार्थने दुहेरी अर्थाचा शब्द वापरला आहे. “S**e ck जागतिक विजेती नशिब आपल्याकडे भारताचे संरक्षण करणारे आहेत. #Rihanna तुला लाज वाटली पाहिजे.” असे अभिनेता सिद्धार्थने म्हटलं.
अभिनेता सिद्धार्थचे स्पष्टीकरण
वाद वाढल्यानंतर सिद्धार्थनेही स्पष्टीकरण दिले आहे. त्यांचा म्हणणे चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहे, कोणाचाही अपमान करण्याचा प्रयत्न केलेला नाही, असे सिद्धार्थने म्हटले आहे.
काय म्हणाली सायना?
याप्रकरणी सायनानेही प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “त्याला (सिद्धार्थ) काय म्हणायचे होते ते मला माहित नाही. एक अभिनेता म्हणून मी त्याच्यावर प्रेम केले पण हे (ट्विट) चांगले नव्हते. तो स्वत:ला चांगल्या शब्दात व्यक्त करू शकतो पण पण मला वाटते की हे ट्विटर आहे आणि अशा शब्दांनी आणि टिप्पण्यांद्वारे तुमची दखल घेतली जाईल.”