Sajad Ahmad Bhat Viral Video: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थानिक घोडेस्वार आणि विक्रेत्यांनी जखमींची मदत केली. हल्ल्यातून सुखरूप वाचलेल्यांनी याबद्दल स्थानिक लोकांचे आभार व्यक्त केले आहेत. हल्ल्यानंतर एका जखमी व्यक्तीला पाठीवर उचलून नेत असल्याचा एका स्थानिक व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पहलगाममधील शाल विक्रेता सजाद अहमद भटने आपल्या पाठीवर जखमी व्यक्तीला सुरक्षित स्थळी हलविले होते. हल्ल्याच्या दिवशी नेमके काय झाले? याबद्दलची माहिती भटने माध्यमांना दिली.
‘मानवता ही कोणत्याही धर्मापेक्षा मोठी आहे’, असे सजाद अहमद भट सांगतो. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना सजाद अहमदने म्हटले की, मंगळवारी मी नेहमीप्रमाणे शाल विक्रीचे काम करत होतो. तेव्हा पहलगाम पोनी असोसिएशनच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर अब्दुल वाहीद वाणी यांनी मिनी स्वित्झर्लंडच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती दिली.
पर्यटकांशिवाय आम्ही काहीच नाही
“हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही ३ वाजेपर्यंत तिथे पोहोचलो. जखमींना आम्ही पानी दिले. ज्या लोकांना चालायला येत नव्हते, त्यांना उचलून घेतले. अनेक जखमींना आम्ही रुग्णालयापर्यंत पोहोचवले. मी जेव्हा भेदरलेल्या पर्यटकांना मी रडताना पाहिले, तेव्हा माझ्या डोळ्यातून आपसूक अश्रू आले. पर्यटक येतात तेव्हाच आमच्या घरातील चूल पेटते. पर्यटकांशिवाय आमचे आयुष्य काहीच नाही”, असेही सजाद अहमद भटने सांगितले.
२२ एप्रिल रोजी बैसरण पर्वतामधील मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या कुरणावर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. ज्यात २६ जणांचा मृत्यू झाला. द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) नामक संघटनेने हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. लष्कर-ए-तैयबा या संघटनेची ही उपसंघटना असल्याचे सांगितले जाते.
पहलगाम पोनी असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल वाहिद वाणी यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, मीच पहिल्यांदा या हल्ल्याची बातमी इतरांना दिली. मी जेव्हा कुरणाच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मी अशा घटनेचा साक्षीदार होईल, असा विचारही कधी आयुष्यात केला नव्हता. आम्ही जखमींना पाठीवर उचलून घेतले. महिलांना घोड्यावर बसवून सुरक्षित स्थळी नेले.