Sajjan Kumar Anti Sikh Riots: १९८४ च्या शीख विरोधी दंगलींदरम्यान झालेल्या हत्येशी संबंधित एका प्रकरणात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दोषी ठरवले आहे. आता १८ फेब्रुवारी रोजी सज्जन कुमार यांच्या शिक्षेबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे. हे प्रकरण १ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीतील सरस्वती विहार परिसरात एका शीख वडील आणि मुलाच्या हत्येशी संबंधित आहे. या प्रकरणात, सज्जन कुमार यांच्यवर जमावाचे नेतृत्व केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांच्या भडकवण्यावरूनच जमावाने दोन शिखांना जिवंत जाळल्याचा आरोप आहे.

१९८४ च्या शीख विरोधी दंगली प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे सरचिटणीस जगदीप सिंग काहलोन म्हणाले, “४० वर्षांपूर्वी शीख हत्याकांडाचे नेतृत्व करणाऱ्या सज्जन कुमार यांना दोषी ठरवण्यात आले आहे आणि त्यांना शिक्षा होईल. यासाठी मी न्यायालयाचे आभार मानतो. सत्तेत आल्यानंतर एसआयटी स्थापन केल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचेही आभार मानतो. बंद प्रकरणांच्या पुनर्तपासाचे हे परिणाम आहेत. जगदीश टायटलर प्रकरणातही आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे.”

बाप-लेकाची हत्या

१ नोव्हेंबर १९८४ रोजी जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांची हत्या करण्यात आली होती. पंजाबी बाग पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु नंतर एका विशेष तपास पथकाने तपास हाती घेतला. १६ डिसेंबर २०२१ रोजी न्यायालयाने सज्जन कुमार यांच्याविरुद्ध आरोप निश्चित केले आणि त्यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी खटला असल्याचे आढळून आले. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, फिर्यादी पक्षाने आरोप केला होता की जमावाने जसवंत यांच्या घरावर हल्ला केला होता. यामध्ये जसवंत आणि त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. तसेच त्यांचे घरही लुटण्यात आले होते. यानंतर त्यांच्या घराला आग लावण्यात आली होती.

भाजपाची काँग्रेसव टीका

न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की, “आज सज्जन कुमार यांना शीखविरोधी दंगलींशी संबंधित आणखी एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. त्यांनी नरसंहार केला. काँग्रेसचे सर्व पाप उघडकीस येत आहेत. मी देशाच्या पंतप्रधानांचे आभार मानतो ज्यांनी एसआयटी स्थापन केली आणि या लोकांना तुरुंगात टाकले. आज देवाने न्याय दिला.”

Story img Loader