उत्तर प्रदेशच्या उनावमध्ये गंगेच्या पात्रात शेकडो मृतदेह आढळून आल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी याप्रकरणी भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनाच आरोपीच्या पिंजऱयात उभे केले आहे. गंगा नदीच्या पात्रात साक्षी महाराज यांनीच ट्रक भरून मृतदेह आणून टाकल्याचे विधान करून आझम खान यांनी खळबळ उडवून दिली आहे.
आझम खान पत्रकार परिषदेत म्हणाले की, “गंगेच्या पात्रातील मृतदेहांना साक्षी महाराज जबाबदार आहेत. साक्षी महाराज यांनीही ट्रक भरून मृतदेह आणून गंगा नदीत टाकले आणि उत्तर प्रदेश सरकारची बदनामी करण्याचा कट रचल्याची माहिती मला मिळाली आहे. यामध्ये ते दोषी आढळले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा.”
गंगेत सापडलेल्या शेकडो मृतदेहांचे गूढ!
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्य़ातील साफीपूर भागातील परियार घाटाजवळ गंगा नदीतून गेल्या दोन दिवसांत मिळालेल्या सुमारे शंभर मृतदेहांबाबत गूढ अद्याप कायम असून याबाबत केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे. मंगळवारी येथून ५० मृतदेह मिळाले होते तर बुधवारी आणखी ३० मृतदेह मिळाले. अजूनही आणखी मृतदेह हाती लागत आहेत. उन्नाव जिल्ह्य़ाच्या न्यायदंडाधिकारी सौम्या अग्रवाल यांनी सांगितले की, आतापर्यंत ८० मृतदेह मिळाले असून आणखी मृतदेह हाती लागत आहेत. इतके मृतदेह एकाच ठिकाणी कसे आणि कोठून वाहून आले याचे गूढ अद्याप उकललेले नाही.

Story img Loader