Sakshi Dhoni on Power Cut : भारताचा माजी कर्णधार, महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीने झारखंडमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. साक्षी धोनी सध्या झारखंडमधील वीज खंडित झाल्यामुळे हैराण आहे. राज्यात निर्माण झालेल्या वीज संकटाबाबत तिने प्रश्न उपस्थित करत सरकारवर सडकून टीका केली आहे. साक्षी धोनीने सोमवारी ट्विटरवर रांचीमध्ये होत असलेल्या विजेच्या लपंडावाबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली.
रांची येथील भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीने राज्याच्या खराब वीज व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ट्विट करून तिने विचारले आहे की, झारखंडमध्ये वर्षानुवर्षे विजेची समस्या का आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. राज्याची करदाता असल्याने मला हे जाणून घ्यायचे आहे. आयपीएल सामन्यांमुळे धोनी महाराष्ट्रात आहे, तर साक्षी कुटुंबासह रांचीमध्ये आहे. रांचीसह संपूर्ण राज्यात विजेचा तुटवडा आहे.
“झारखंडची करदाती म्हणून मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की झारखंडमध्ये इतक्या वर्षांपासून वीज संकट का आहे? आम्ही ऊर्जा वाचवत आहोत याची खात्री करून जबाबदारीने आमची भूमिका बजावत आहोत!,” असे साक्षी धोनीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. वीजपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर साक्षीच्या चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
याआधी केली होती तक्रार
साक्षी धोनीने २०१९ मध्येही वीज संकटावर प्रश्न उपस्थित केले होते. रांचीच्या लोकांना दररोज वीज खंडित होण्याचा सामना करावा लागतो. दररोज चार ते सात तास वीजपुरवठा खंडित होतो. आज म्हणजेच १० सप्टेंबर २०१९ रोजी गेल्या पाच तासांपासून वीज नाही. आज हवामान योग्य असल्याने वीज खंडित होण्याचे कारण समजले नाही आणि आज सणही नाही. संबंधित अधिकारी या समस्येचे निराकरण करतील अशी आशा आहे,” असे साक्षीने म्हटले होते.
राज्याच्या बहुतांश भागात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने झारखंडमधील लोक सतत लोडशेडिंगमुळे हैराण झाले आहेत. पश्चिम सिंगभूम, कोडरमा आणि गिरिडीह जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेने वेढले आहे. तर रांची, बोकारो, पूर्व सिंगभूम, गढवा, पलामू आणि चतरा येथे २८ एप्रिलपर्यंत वातावरण खूप उष्ण राहण्याची शक्यता आहे.
मागणीनुसार वीजपुरवठा न झाल्याचा परिणाम राज्यात दिसून येत आहे. दिवसाही विजेचे लोडशेडिंग करण्यात येत आहे.. सोमवारीही ४०० मेगावॅटहून अधिकचा तुटवडा जाणवला. इंडियन एनर्जी एक्स्चेंजकडून वीज न मिळणे हेही याचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती लवकरच सुधारण्याची शक्यता आहे.
सोमवारी उर्जा मंत्री आरके सिंह आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वीज प्रकल्पांना कोळशाच्या कमी पुरवठ्यामुळे वाढत्या ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन धोरणांवर चर्चा केली. यादरम्यान विजेच्या मागणीला सामोरे जाण्यासाठी धोरण आखण्यात आले.