Wrestlers Protest against Brij Bhushan Singh : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात देशातल्या काही आघाडीच्या महिला कुस्तीपटू गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतल्या जंतर-मंतर मैदानात आंदोलन करत आहेत. महिला कुस्तीपटू साक्षी मलिकही या आंदोलनात सहभागी झाली आहे. परंतु साक्षी मलिकचा बृजभूषण शरण सिंह यांच्यासोबतचा एक जुना फोटो व्हायरल केला जात आहे. हा फोटो साक्षी मलिकच्या लग्नातला आहे. साक्षी मलिकच्या लग्नाला बृजभूषण शरण सिंह यांनी हजेरी लावली होती. या फोटोत साक्षी आणि बृजभूषण शेजारी-शेजारी उभे राहिले आहेत. हा फोटो पाहून अनेकजण साक्षीला प्रश्न विचारत आहेत की, तू त्यांना तुझ्या लग्नाला का बोलावलं होतंस?
साक्षी मलिकने आरोप केला आहे की, बृजभूषण सिंह यांनी २०१५-१६ च्या दरम्यान, तिचा छळ केला होता. परंतु साक्षी मलिकचं लग्न २०१७ मध्ये झालं होतं. या लग्नाला बृजभूषण यांनी हजेरी लावली होती. जर बृजभूषण यांनी तिचा छळ केला होता किंवा तिचा विनयभंग केल्याचा ती आरोप करत असेल तर तिने त्यांना आपल्या लग्नाला का बोलावलं असा प्रश्न बृज भूषण शरह सिंह यांच्या काही समर्थकांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे.
दरम्यान, साक्षी मलिकने गायिका चिन्मयी श्रीपदाचं ट्वीट रीट्विट करून नेटकऱ्यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिलं आहे. चिन्मयी श्रीपदाने एका नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देत म्हटलं आहे, एखाद्या महिलेशी छेडछाड करणारी व्यक्ती जर सत्तेत बसली असेल तर तिच्याकडे कोणताही पर्याय नसतो.
तसेच साक्षीला एका मुलाखतीच्या वेळी बृजभूषण यांना लग्नाचं आमंत्रण दिल्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर साक्षी म्हणाली, ते आमच्या कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. वर्षातून सहा ते सात महिने आमची प्रशिक्षणं शिबीरं सुरू असतात. तीन ते चार महिने ऑफ सीझन असतो, त्यावेळी आम्ही घरीच असतो. शिबिरांच्या दरम्यान आमची सातत्याने भेट होते. आमचे ट्रायल्स सुरू असताना ते (बृजभूषण सिंह) येतात. स्पर्धांच्या वेळी ते येतात. आमच्या शिबिरांमध्ये येतात. आम्ही त्यांना आमंत्रण दिलं नाही तर त्यांच्याकडून एखादी नकारात्मक प्रतिक्रिया येऊ शकते. आम्हाला तुम्ही बोलवत नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया येऊ शकते. त्यांची ताकद पाहता त्यांना आमंत्रण द्यावंच लागणार. अन्यथा काय होईल ते सांगता येत नाही.
हे ही वाचा >> कालीमातेच्या अपमानानंतर रशियाने युक्रेनला सुनावले खडे बोल; हिंदुंच्या बाजूने रशियाचे प्रतिनिधी म्हणाले, “लोकांच्या आस्थेची…”
बृजभूषण शरण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल
दरम्यान, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची अखेर दिल्ली पोलिसांनी दखल घेतली असून बृजभूषण शरण सिंह यांच्यावर ‘पोक्सो’सह आणखी एका कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या खेळाडूंनी समाधान व्यक्त केलं आहे. परंतु, बृजभूषण शरण सिंह यांना अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं खेळाडूंनी स्पष्ट केलं आहे.