आर्थिक मंदीचे वातावरण, सातत्याने वाढत असलेली महागाई आणि ढासळत चाललेले उत्पादन हे यंदा वेतनचिठ्ठीच्या मुळावर आले आहे. या वर्षी नोकरदारांच्या वेतनात केवळ १०.३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या दहा वर्षांतील ही आतापर्यंतची सर्वात कमी वाढ असेल.
मानव संसाधन क्षेत्रातील एऑन हेविट या कंपनीने हा अंदाज वर्तविला आहे. एऑन हेविटच्या सतराव्या वार्षिक वेतनवाढ सर्वेक्षण अहवालानुसार देशातील वाईट आर्थिक परिस्थितीमुळे यंदा कर्मचाऱ्यांच्या पगारात कंपन्या सरासरी १०.३ टक्के वाढ करतील. मात्र ही टक्केवारी पुढे घटून साडेनऊ ते नऊ टक्क्यांवरही येण्याची शक्यता आहे.
एऑन हेविटची भारतातील भागीदार कंपनी टॅलेन्ट अ‍ॅण्ड रिवॉर्ड्सचे संदीप चौधरी यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, यंदा संभाव्य वेतनवाढीच्या आलेखावर भारताचा क्रमांक जगात पंधरावा आहे, तर व्हेनेझुएला पहिल्या (२५.६ टक्के वाढ), अर्जेटिना (२४.२ टक्के) दुसऱ्या, तर व्हिएतनाम (१२.६ टक्के) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मात्र या काळ्या ढगांना एक सोनेरी किनारही आहे. ती म्हणजे, कंपनीतील महत्त्वाच्या आणि हुशार कर्मचाऱ्यांच्या पगारात इतरांहून अधिक चांगली (सरासरी १४.१ टक्के) वाढ संभवते.
डिसेंबर २०१२ ते जानेवारी २०१३ या कालावधीत देशातील ५०० कंपन्यांतील सध्याचा आणि संभाव्य पगार, भत्ते आदींच्या सर्वेक्षणानंतर हा अहवाल तयार करण्यात आला.

Story img Loader