गेल्या दोन वर्षांत करोनामुळे समाजातल्या प्रत्येक घटकाला मनस्ताप सहन करावा लागला आहे. सामान्यजनांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. अनेकांचे रोजगार गेले, तर काहींना पगार कपात सहन करावी लागली. या पार्श्वभूमीवर करोनाचं संकट काही अंशी कमी झाल्यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नोकरदार वर्गासाठी दिलासादायक माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली असून यंदा गेल्या पाच वर्षांतली सर्वात मोठी पगारवाढ नोकदार वर्गाला मिळणार असल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणातून समोर आला आहे.
एऑन या संस्थेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून नोकरदारांसाठी खुशखबर ठरलेला हा निष्कर्ष समोर आला आहे. देशभरातल्या कंपन्यांनी या वर्षी अर्थात २०२२ सालात तब्बल ९.९ टक्के पगारवाढ होणार असल्याचं नमूद केलं आहे. गेल्या वर्षी सरासरी ९.३ टक्के पगारवाढ झाली होती.
चीन, रशियापेक्षा जास्त पगारवाढ!
एऑननं केलेल्या सर्वेक्षणानुसार चीन, रशिया अशा ब्रिक्स देशांच्या संघापैकी इतर कोणत्याही देशापेक्षा भारतात सर्वाधिक पगारवाढ होणार आहे. चीनमध्ये यंदा सरासरी ६ टक्के पगारवाढ होणार असून रशियामध्ये हेच प्रमाण ६.१ टक्के इतकं आहे. तसेच, ब्राझीलमध्ये सरासरी ५ टक्के पगारवाढ होणार असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
SBI Recruitment 2022: विविध पदांसाठी भरती, ६३ हजारांहून अधिक पगार, जाणून घ्या तपशील
कसा केला सर्व्हे?
या सर्वेक्षणामध्ये देशभरातील एकूण ४० प्रकारच्या व्यवसायांमधील कंपन्या सहभागी झाल्या होत्या. एकूण १५०० कंपन्यांनी दिलेल्या प्रतिसादाच्या आधारे सर्वेक्षणातील सरासरी आकडेवारी काढण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक पगारवाढ देणाऱ्या कंपन्यांमध्ये ई-कॉमर्स, भागभांडवल, आयटी, लाईफ सायन्स अशा क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे.