सलग दुसरी रात्र तुरुंगात काढणारा अभिनेता सलमान खान रात्रभर अस्वस्थ, बेचैन होता असे वृत्त न्यूज १८ ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. १९९८ सालच्या काळवीट शिकार प्रकरणात सलमानला जोधपूर सत्र न्यायालयाने पाच वर्ष तुरुंगावासाची शिक्षा सुनावली आहे.
कैदी नंबर १०६ असलेल्या सलमानला जोधपूर कारागृहाच्या बराक नंबर दोनमध्ये ठेवण्यात आले असून सलमानला जेलमध्ये आसाराम बापूचा शेजार मिळाला आहे. स्वंयघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू मागच्या काही वर्षांपासून बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात बंद आहे. तुरुंगात सलमान आणि आसाराममध्ये फक्त एका पडद्याचे अंतर आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमानने तुरुंगातील कैद्यांना देण्यात येणारे डाळ-रोटीचे जेवण नाकारले पण आसारामने दिलेली जेवणाची ऑफर त्याने स्वीकारली. सलमानने आसारामच्या डब्ब्यातील काही पदार्थ खाल्ले. त्यानंतर आसारामने स्वत:ची झोपण्याची गादी सलमानला देऊ केली पण सलमानने त्याला नकार दिला अशी माहिती सूत्रांनी दिली.
बॉलिवूडचा हा स्टार जमिनीवर घोंगडी अंथरुन त्यावर झोपला अशी सूत्रांची माहिती आहे. एका रात्रीत तीनवेळा सलमानचा रक्तदाब वाढला. डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याला गोळया देण्यात आल्या आहेत असे सूत्रांनी सांगितले.
न्यायालयाने सलमानला दोषी ठरवतानाच या प्रकरणात अन्य आरोपींना दोषमुक्त केले. यामुळे सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांना दिलासा मिळाला. काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरमधील न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. न्या. देवकुमार खत्री यांनी या प्रकरणी निकाल दिला.
मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी देव कुमार खत्री यांनी निकाल देताना महत्वाची निरीक्षण नोंदवली. आरोपी हा लोकप्रिय कलाकार असून लोक त्यांच्या कृतीचे अनुकरण करतात असे खत्री यांनी आपल्या निकालात म्हटले आहे. बचाव पक्षाने सलमानला याआधी कुठल्याही प्रकरणात शिक्षा झालेली नाही. तो नेहमीच दिलेल्या तारखेला उपस्थित राहिला आहे असे न्यायालयाला सांगितले. सलमान पाच दिवस वनविभागाच्या ताब्यातही होता.