Bishnoi Gang Threat to Salman Khan : अभिनेता सलमान खानला ठार करण्यासाठी बिश्नोई गँगने २५ लाखांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर बिश्नोई गँग पुन्हा चर्चेत आली. सलमान खान त्यांच्या टार्गेटवर आहे हे आधीही समोर आलं होतं. आता सलमान खानला मारण्यासाठी बिश्नोई गँगने २५ लाखांची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात त्याच्या घराबाहेर गोळीबारही झाला होता. १२ ऑक्टोबरला बाबा सिद्दीकींची हत्या झाली. त्यानंतर आता सलमान बाबत ही माहिती समोर आली आहे.

२५ लाखांची सुपारी, ७० जणांची पाळत

सलमान खानला मारण्यासाठी आरोपींनी पाकिस्तानातून AK ४७, AK ९२, M १६ ही अत्याधुनिक शस्त्रं विकत घेतली होती. तसंच ज्या बंदुकीने पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आली त्या तुर्की बनावटीच्या जिगना हत्याराने सलमान खानला मारण्याचा प्रयत्न होता अशी माहिती पोलिसांच्या चार्जशीटमध्ये आहे. नवी मुंबई पोलिसांनी ‘सुखा’ नावाच्या आरोपीला या प्रकरणात अटक केली आहे. सुखाने सलमानच्या हत्येचा कट रचला होता. सुखा हा मूळचा हरियाणाचा आहे. त्याला आज कोर्टात नेण्यात आलं. जून महिन्यात ही माहिती समोर आली होती. तसंच सुमारे ६० ते ७० लोक सलमानवर पाळत ठेवत होते अशीही माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या चार्जशीटमध्ये काय म्हटलं आहे?

चार्जशीटमध्ये हा उल्लेख करण्यात आला आहे की सलमान खानला मारण्याचा कट ऑगस्ट २०२३ ते एप्रिल २०२४ च्या दरम्यान आखला गेला. ६० ते ७० लोक सलमान खानच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होते. सलमान खानचं मुंबईतलं घर आणि पनवेल येथील फार्महाऊस या ठिकाणी रेकी करण्यात आली होती. तसंच गोरेगाव फिल्म सिटी मध्ये सलमान खानची ये-जा कधी होते आहे? यावरही पाळत ठेवली जात होती. शूटर गोल्डी ब्रार आणि अनमोल बिश्नोई हे दोघंही सलमानला कधी उडवायचं आहे या ऑर्डरची वाट बघत होते. हे सगळे शूटर्स, पुणे, रायगड, मुंबई, ठाणे आणि गुजरातमध्ये लपले होते.

हे पण वाचा- बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानचं कुटुंब चिंतेत! भाऊ अरबाज म्हणाला, “सध्या बऱ्याच गोष्टी…

सलमानला ठार करुन श्रीलंकेला जायचंही ठरलं होतं

सलमान खानला ठार केल्यानंतर सगळ्या शूटर्सनी कन्याकुमारी या ठिकाणी एकत्र यायचं असंही ठरलं होतं. या ठिकाणी आल्यानंतर बोटीतून श्रीलंका गाठायची. भारतीय तपास यंत्रणांना अशा पद्धतीने गुंगारा द्यायचा असंही ठरलं होतं. पोलिसांनी हेदेखील म्हटलं आहे की सुखा नावाचा शूटर, अजय कश्यप आणि चार जणांना सलमान खानच्या हत्येसाठी सुपारी देण्यात आली होती. अजय कश्यपने सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसची रेकी केली होती असाही उल्लेख चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे.