काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी लिहिलेल्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकामध्ये सलमान खुर्शिद यांनी हिंदुत्वाची तुलना आयसिस आणि बोको हरामसारख्या दहशतवादी संघटनांसोबत केली आहे. या पार्श्वभूमीवर या पुस्तकातील उल्लेखाविषयी मोठी चर्चा सुरू झाली असून भाजपाकडून देखील त्यावर तीव्र आक्षेप घेण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये सलमान खुर्शिद यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. पण नेमकं या पुस्तकात हिंदुत्वाविषयी काय म्हटलं आहे?
आयसिस, बोको हराम आणि हिंदुत्व!
सलमान खुर्शिद यांनी Sunrise Over Ayodhya : Nationhood in Our Times या पुस्तकात हिंदुत्वाविषयी टिप्पणी केली आहे. या पुस्तकाच्या ‘द सॅफ्रॉन स्काय’ या प्रकरणामध्ये हिंदुत्वाची बोको हराम, आयसिसशी तुलना केली आहे. “ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरुपामुळे बाजूला सारलं गेलं आहे. हे आक्रमक हिंदुत्व आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरुपासारखंच आहे”, अशा आशयाचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. हिंदुत्वाचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं आहे.
..म्हणून हिंदू राष्ट्राला पाठिंबा मिळतोय?
या पुस्तकामध्ये सलमान खुर्शिद यांनी हिंदू राष्ट्रसंदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर देखील भूमिका मांडली आहे. “सध्या हिंदू राष्ट्राविषयी बोलणं फार सामान्य झालं आहे. फक्त सरकारी पातळीवर अधिकृतपणे त्याविषयी बोललं जात नाही. नॅशनल अकॅडेमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च संस्थेचे प्रमुख आणि अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचे माजी रजिस्ट्रार प्राध्यापक फैजान मुस्तफा यांनी नकतंच असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जर आपलं हिंदू राष्ट्र झालं तर आपल्या अनेक राजकीय अडचणी सुटतील”, असा उल्लेख सलमान खुर्शिद यांनी पुस्तकात केल्याचं नवभारत टाईम्सनं म्हटलं आहे.
हिंदुत्वाची आयसिस, बोको हरामशी तुलना; सलमान खुर्शिदांच्या नव्या पुस्तकावरून वाद
“कदाचित प्राध्यापक मुस्तफा यांना असं म्हणायचं असेल की या देशातील अल्पसंख्य देखील आता इथल्या धर्मनिरपेक्षतेच्या फसवाफसवीला कंटाळले आहेत. कारण सर्वच सरकारी संस्था एका धर्माच्या दिशेने झुकल्या आहेत. कदाचित हिंदू राष्ट्र झाल्यास शांती मिळायला मदत होईल आणि देशाला आत्मविनाशाच्या मार्गाने जाण्यापासून वाचवता येईल”, असंही या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे.
काँग्रेसमधील हिंदुत्व समर्थक नेत्यांवरही निशाणा
या पुस्तकात सलमान खुर्शिद यांनी काँग्रेसमधली काही हिंदुत्व समर्थक नेत्यांवरही निशाणा साधला आहे. “माझ्या स्वत:च्या काँग्रेस पक्षात नेहमीच चर्चा हिंदुत्वाच्या दिशेने वळते. काँग्रेसमधील एक गट असा आहे ज्यांना या गोष्टीचं वाईट वाटतं की काँग्रेसची प्रतिमा ही अल्पसंख्याक समर्थक पक्षाची आहे. त्यांनी अयोध्या प्रकरणावर आलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना घोषणाच करून टाकली की आता या ठिकाणी भव्य मंदिर बांधलं गेलं पाहिजे. मात्र, असं करताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या त्या भागाकडे दुर्लक्ष केलं ज्यात मस्जिदसाठी देखील जमीन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत”, असं या पुस्तकात नमूद केलं आहे.
अयोध्या प्रकरणावरील निकालाचं कौतुक
आपल्या पुस्तकात सलमान खुर्शिद यांनी अयोध्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. “न्यायालयाच्या निर्णयामुळे कुणाची हार देखील झाली नाही आणि कुणाचा विजय देखील झालेला नाही. अयोध्या प्रकरणावरून समाजात फूट पडण्याची स्थिती होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर तोडगा काढला. न्यायालयानं या निकालात खूप लांबचं पाहण्याचा प्रयत्न केला आहे. हा असा निर्णय आहे की ज्यातून असं अजिबात वाटत नाही की अमुक लोक जिंकले आणि अमुक हरले. मात्र, यामध्ये सगळ्यांना जोडून घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा. सध्या अयोध्येच्या उत्सवावरून असं वाटतं की तो एकाच पक्षाचा उत्सव आहे”, असं देखील या पुस्तकात सलमान खुर्शिद यांनी म्हटलं आहे.