‘कोणताही भारतीय पंतप्रधान तुम्हाला काश्मीर कधीच देणार नाही’, असे भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नवाज शरीफ यांना सांगितले होते, असा गौप्यस्फोट माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शिद यांच्याकडून करण्यात आला. २०१३मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेवेळी मनमोहन सिंग आणि नवाज शरीफ यांची भेट झाली होती. त्यावेळी नवाज शरीफ यांच्याशी बोलताना मनमोहन सिंग म्हणाले होते की, मियाँ साहब, कोणताही भारतीय पंतप्रधान तुम्हाला काश्मीर देणार नाही. हा प्रश्न खूपच व्यापक आहे, असे मनमोहन सिंग यांनी शरीफ यांना सांगितले होते. यूपीए सरकार भारत-पाक संबंध सुरळीत राहावेत, यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे या प्रयत्तांना खीळ बसली. त्यानंतर २००९ मध्ये मनमोहन सिंग आणि सय्यद युसुफ रझा गिलानी यांच्या शर्म-अल-शेख यांनी एकमेकांची भेट घेऊन भारत-पाक संबंध पुन्हा सुरळीत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी भाजपने या प्रकरणावरून रान उठविल्याचे खुर्शिद यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. सलमान खुर्शिद यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘द अदर साईड ऑफ द माऊंटन’ या पुस्तकातील ‘द पाकिस्तान पझल’ या प्रकरणात तत्कालीन सरकारच्या काळातील आठवणींना उजाळा देण्यात आला आहे.