काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांच्या सनराईज ओव्हर अयोध्या या पुस्तकावरून सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. या पुस्तकात सलमान खुर्शिद यांनी हिंदुत्वाची तुलना बोको हराम किंवा आयसिससोबत केल्याची टीका केली जाऊ लागली आहे. या मुद्द्यावरून भाजपाकडून टीका कली जात असताना त्यावर सलमान खुर्शिद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी त्यांना दहशतवादी म्हणालोच नाही, असं सलमान खुर्शिद म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या प्रतिक्रियेवरून नवी चर्चा सुरू झाली आहे.
‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकातल्या ‘द सॅफ्रॉन स्काय’ या प्रकरणामध्ये सलमान खुर्शिद यांनी ही तुलना केली आहे “ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरुपामुळे बाजूला सारलं गेलं आहे. हे आक्रमक हिंदुत्व आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरुपासारखंच आहे”, अशा आशयाचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकाच्या पान क्रमांक ११३ वर हा उल्लेख करण्यात आलेला आहे. या मुद्द्यावरून सध्या वाद निर्माण झाला असून या पुस्तकावर आणि सलमान खुर्शिद यांच्यावर टीका केली जात आहे.
हिंदुत्वाची आयसिस, बोको हरामशी तुलना; सलमान खुर्शिदांच्या नव्या पुस्तकावरून वाद
या मुद्द्यावरून वाद सुरू झाल्यानंतर सलमान खुर्शिद यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मी या लोकांना दहशतवादी म्हणालेलोच नाही. मी फक्त म्हणालो आहे की ते धर्माचा विपर्यास करण्यात सारखे आहेत. हिंदुत्वानं काय केलंय, तर सनातन धर्म आणि हिंदुत्ववादाला बाजूला सारलं आहे. आणि बोको हराम आणि आयसिसप्रमाणेच त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, असं मी पुस्तकात म्हटलं आहे”, असं सलमान खुर्शिद म्हणाले आहेत.
“मला इतर कुणीही त्यांच्यासारखं दुसरं दिसलं नाही. मी म्हटलं ते त्यांच्यासारखे आहेत. एवढंच याचा हिंदुत्ववादाशी काहीही संबंध नाही. हिंदुत्वाच्या समर्थकांकडून ज्या पद्धतीने त्याचा प्रचार केला जातोय, ते म्हणजे धर्माचा विपर्यास आहे”, असं दखील खुर्शिद यांनी नमूद केलं.
पुस्तकावर बंदीसाठी प्रयत्न सुरू
दरम्यान, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. “मध्य प्रदेशमध्ये या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी मी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेईन. त्यांचं हे पुस्तक आक्षेपार्ह आहे. ते देशाला जातीच्या आधारावर विभक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भारत तेरे टुकडे होंगे असं म्हणणाऱ्यांकडे जाणारे पहिले राहुल गांधी नव्हते काय? सलमान खुर्शिद देखील त्याच अजेंड्यावर काम करत आहेत”, अशी प्रतिक्रिया नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे.