वृत्तसंस्था, न्यूयॉर्क : भारतीय वंशाचे बुकर पुरस्कारविजेते लेखक सलमान रश्दी यांच्यावर शुक्रवारी व्याख्यानाच्या कार्यक्रमात एका माथेफिरूने चाकूहल्ला केला. त्यात त्यांच्या मानेला गंभीर जखम झाली असून हवाई रुग्णवाहिकेने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पश्चिम न्यूयॉर्कमधील एका संस्थेने आयोजित केलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला रश्दी मंचावर उपस्थित होते. ते व्याख्यान सुरू करणार तोच हल्लेखोराने मंचावर धाव घेऊन त्यांच्यावर आणि संवादकावर हल्ला केला. हल्लेखोराने रश्दी यांच्या मानेवर वार केला.
घटनास्थळी ‘असोसिएटेड प्रेस’ या वृत्तसंस्थेचा प्रतिनिधी उपस्थित होता. त्याने दिलेल्या वृत्तानुसार रश्दी यांचे व्याख्यान सुरू होण्यापूर्वी आयोजक त्यांची ओळख करून देत होते. त्याचवेळी हल्लेखोर मंचावर धावत गेला आणि त्याने रश्दी यांच्यावर दहा ते बारा वेळा वार केले. त्यात रश्दी खाली कोसळले. त्यांची मुलाखत घेणाऱ्या संवादकावरही हल्लेखोराने हल्ला केला. त्यात त्याच्या डोक्याला किरकोळ जखम झाली आहे. हल्लेखोराला सुरक्षारक्षकांनी अटक केली असून पोलिसांनी या हल्ल्याचा तपास सुरू केला आहे.
मूळ मुंबईत जन्मलेल्या रश्दी यांची ‘सॅटेनिक व्हर्सेस’ ही कांदबरी वादग्रस्त ठरली होती. त्यांना ठार मारण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यांच्या ‘मिडनाईट चिल्ड्रेन’ या कांदबरीला प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार मिळाला आहे.