Gopan Swami Samadhi : केरळमधील तिरुअनंतपुरम येथे एका पुजाऱ्याच्या घरी एक पोस्टर लावण्यात आलं होतं. त्या पोस्टरवर गोपन स्वामींनी समाधी घेतल्याचं लिहिलेलं होतं. एवढंच नाही तर ७९ वर्षीय गोपन स्वामी यांनी समाधी घेतल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. मात्र, कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यावर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना संशय आला. त्यानंतर या प्रकरणाची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. पण तरीही गोपन स्वामी यांनी समाधी घेतल्याचा दावा कुटुंबीयांकडून करण्यात आला. पण शेजारी राहणाऱ्या लोकांचं म्हणणं होतं की गोपन स्वामी हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते आणि ते अंथरुणाला खिळून होते. दरम्यान, यानंतर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात ती कबर खोदून ६९ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर हा मृतदेह गोपन स्वामीचा असल्याचं समोर आलं. त्यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, यासंदर्भात सहाय्यक पोलीस अधीक्षक एस. शाजी यांनी माहिती देतान सांगितलं की, रासायनिक विश्लेषण, आतड्यांसंबंधी तपासणी आणि हिस्टोपॅथॉलॉजी अहवाल मिळाल्यानंतर ६९ वर्षीय स्वामी यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला की नाही याबाबत अंतिम निष्कर्ष काढता येणार आहे. तसेच त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत. मात्र, मृतदेह बाहेर काढण्यात आला तेव्हा मृतदेह बसलेल्या स्थितीत आणि राखेने झाकलेला होता. आता शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. आता शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर गोपन स्वामी यांच्या मृत्यूमागील गूढ समोर येणार आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

पोलिसांनी ६९ वर्षीय गोपन स्वामी यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी कबर उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा गोपन स्वामी यांची पत्नी सुलोचना आणि मुले राजसेनन आणि सनंदन यांनी विरोध केला होता. मात्र, त्यानंतरही पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, वैकुंड स्वामी धर्म प्रचार सभाचे अध्यक्ष विष्णुपुरम चंद्रशेखरन यांनी यासंदर्भात बोलताना देताना सांगितलं की, “आम्ही शुक्रवारी महासमाधीची योजना आखली, ज्यात अनेक स्वामी आणि आश्रमाचे प्रमुख उपस्थित राहतील. त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला हे निष्कर्ष त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्याशी जुळतात. एका अध्यात्मिक गुरूचा अपमान झाला असून त्यांना महासमाधी देण्यात येणार आहे. गोपन स्वामींनी समाधी घेतली होती, त्यावरून वाद निर्माण झाला. मात्र, यामध्ये वाद करणाऱ्यांना इतिहास माफ करणार नाही”, असं त्यांनी म्हटलं.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबर पाडण्यात आली

गोपन स्वामींनी समाधी घेतल्याच्या दाव्यानंतर पोलिसांकडून ही समाधी खोदण्यात येण्याच्या विरोधात गोपन स्वामी यांच्या कुटुंबीयांनी थेट केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आणि पोलिसांना समाधी खोदण्यास किंवा उत्खनन करण्याचा प्रयत्न करण्यापासून रोखण्याचा आदेश देण्यात यावा अशी मागणी केली. मात्र, या प्रकरणात न्यायालयाने तपासात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच बेपत्ता झालेल्या किंवा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा समावेश असलेल्या प्रकरणांचा तपास करण्याचा अधिकार तपास यंत्रणांना असल्याचं न्यायालयाने म्हटलं होतं. तसेच या प्रकरणात काहीतरी संशयास्पद वाटत असल्यामुळे तपास थांबवता येणार नाही, असं म्हटलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samadhi case news kerala thiruvananthapuram guru gopan swami samadhi the police directly dug the grave and took out the body gkt