Samajwadi Party Protest: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये राज्य विधान भवनावर समाजवादी पक्षाने मोर्चा काढला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशातील विरोधी पक्षनेते अखिलेश यादव भाजपाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. देशातील बरोजगारी आणि महागाईविरोधात समाजवादी पक्ष आक्रमक झाला आहे. परवानगी नाकारल्यानंतरही समाजवादी पक्षाने हा मोर्चा काढल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, शहरातील पक्षाच्या कार्यालयाबाहेर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह चित्रफित प्रकरण, विद्यार्थ्यांची निदर्शने सुरूच; विद्यापीठ दोन दिवस बंद
उत्तर प्रदेश विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच समाजवादी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवसआधी समाजवादी पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बेरोजगारी, महागाई, वीज पुरवठ्याचा अभाव आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराविरोधात सपा कार्यकर्ते हे आंदोलन करत आहेत.
आंदोलनादरम्यान अखिलेश यादव आणि सपा आमदारांनी रस्त्यावर बसून भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याच ठिकाणावरुन आता विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होईल, असे यावेळी अखिलेश यादव म्हणाले. या आंदोलनाची समाजवादी पक्षाने परवानगी घ्यायला हवी होती, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी पालन करावे, ही फारच मोठी अपेक्षा असल्याचा टोला आदित्यनाथ यांनी लगावला आहे. या आंदोलनावर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री के. पी मौर्या यांनीदेखील टीका केली आहे. “समाजवादी पक्षाला सध्या कुठलेही काम नाही. अशाप्रकारच्या आंदोलनांमुळे सामान्य जनतेसाठी समस्या निर्माण होत आहेत. समाजवादी पक्षाला काही मुद्द्यांवर चर्चा करायची असल्यास आम्ही चर्चेसाठी तयार आहोत”, असे मौर्या यांनी म्हटले आहे.