नवी दिल्ली : ‘भारत जोडो’ यात्रेत मित्र पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसने केले असले तरी, काँग्रेसचे हे निमंत्रण न स्वीकारण्याचा निर्णय समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीतील नुकसानीच्या संभाव्य भीतीमुळे त्यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
समाजवादी पक्षाचा उत्तर प्रदेशातील सहकारी राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी हेदेखील यात्रेत सहभागी होण्याची शक्यता नाही. तर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनीही यात्रेपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ‘सप’ने काँग्रेसशी युती केली होती. त्याचा मोठा फटका पक्षाला बसला. अखिलेश यात्रेत सहभागी झाले तर २०२४ च्या लोकसभेत काँग्रेसशी आघाडी होत असल्याचा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. २०१९ मधील चूक आगामी लोकसभा निवडणुकीत टाळण्याचा प्रयत्न अखिलेश यादव करीत आहेत, असे मानले जाते.
‘भारत जोडो’ यात्रेचा पुढील टप्पा ३ जानेवारीला उत्तर प्रदेशमधून सुरू होणार आहे. यावेळी काँग्रेसने बिगर भाजप पक्षांच्या नेत्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसच्या यात्रेत सहभागी झाल्यास मतदारांमध्ये चुकीचा संदेश पोहोचण्याची भीती ‘सप’चे प्रमुख अखिलेश यादव यांना वाटू लागल्याची चर्चा आहे. मात्र अखिलेश यांचे अन्य कार्यक्रम असल्यामुळे ते यात्रेत सहभागी होऊ शकत नसल्याचा दावा ‘सप’चे प्रवक्ते राजेंद्र चौधरींनी केला. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ‘मिशन २०२४’ची सुरुवात झाली असून जानेवारीत पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, संघटना महासचिव बी. एल. संतोष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत.