राम मंदिर हे निरुपयोगी असल्याचे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या विधानानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत असून भाजपानेही या विधानाचा निषेध केला आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्याचे विधान म्हणजे देशभरातील लाखो रामभक्तांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.
राम गोपाल यादव नेमकं काय म्हणाले?
राम गोपाल यादव यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी विविध विषयांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना विरोधकांच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान उपस्थित न राहण्याच्या निर्णयाबाबत विचारण्यात आलं असता, “आम्ही दररोज प्रभू श्रीरामाला नमस्कार करतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा – मतदानाआधी समाजवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा मुलगा अडचणीत; स्विमिंग पूलमधील ‘ते’ फोटो व्हायरल
पुढे बोलताना त्यांनी राम मंदिराच्या वास्तूवर टीका करताना त्यांनी वादग्रस्त विधान केलं, “अयोध्येतील राम मंदिर चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलं आहे. हे मंदिर निरुपयोगी असून वास्तू शास्त्रानुसार निर्माण करण्यात आलेले नाही. मंदिरे अशाप्रकारे दक्षिणेकडून उत्तरेकडे बांधली जात नाहीत”, असे ते म्हणाले.
योगी आदित्यनाथ म्हणाले…
दरम्यान, राम गोपाल यादव यांच्या विधानाचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निषेध केला आहे. “अशा प्रकारचे विधान करून राम गोपाल यादव यांनी देशभरातील राम भक्त तसेच सनातन धर्माचा अपमान केला आहे. हे लोक केवळ काही मतांसाठी हिंदूंच्या श्रद्धेशी खेळत आहेत. भारतीय समाज हे कधीच स्वीकार करणार नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.