समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि पक्षाचे नेते आझम खान यांनी आज (मंगळवार) लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकेड सुपूर्द केला आहे. अखिलेश यादव २०१९ मध्ये आझमगड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, अखिलेश यादव मैनपुरी जिल्ह्यातील करहल विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांचा ६७ हजार ५०४ मतांच्या फरकाने पराभव करून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
अखिलेश यादव आता विधानसभेत विरोधक म्हणून भूमिका बजावणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन अखिलेश यादव यांनी राजीनामा सुपूर्द केला. तर, समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान हे उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. विधानसभा निवडणुकीत आझम खान यांनी रामपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या आकाश सक्सेना यांचा ५५ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून योगी सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे. तर समाजवादी पार्टीला विरोधी पक्षाची भूमिका निभवावी लागणार आहे. अखिलेश यादव यांनी आता राज्याच्या राजकारणात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका बजावणार आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या विरोधात मैदानी तयारी करण्यासाठी ते राज्याच्या राजकारणात सक्रियपणे सहभागी होतील, असे दिसत आहे.
यापूर्वी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांनी लोकसभा खासदार असताना, विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. तेव्हा त्यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नसतानाही त्यांनी विधानसभेची जागा सोडत, लोकसभेचे सदस्यत्व कायम ठेवले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात फारसा वेळ न दिल्यामुळे त्यांच्या पक्षाला आणखी पराभवाला सामोरे जावे लागले.
याउलट आता समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विधानसभेची जागा कायम ठेवली आणि पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांचे पाऊल कितपत प्रभावी ठरेल हे येणारा काळच सांगेल. विधानसभेत योगी सरकारचा मुकाबला करण्यासाठी सध्या ते जोरदार तयारी करत आहेत.