समाजवादी पार्टीचे अध्यक्ष तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव काँग्रेसच्या भारत जोडो न्याया यात्रेत सहभागी झाले. गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांत जागावाटपावर चर्चा चालू होती. मात्र या चर्चेतून ठोस असा तोडगा निघत नव्हता. मात्र शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) जागावाटपाच्या चर्चेवर या दोन्ही पक्षांत सहमती झाली. त्यानंतर अखिलेश यादव यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील या यात्रेत सहभाग नोंदवला. ही यात्रा सध्या उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे आहे.
जागावाटपावर सहमती झाल्यानंतरच यात्रेत हजेरी
काही दिवसांपूर्वी जागावाटपावरील चर्चेत ठोस तोडगा न निघाल्यामुळे समाजवादी आणि काँग्रेस यांच्यातील वाद टोकाला गेला होता. त्यानंतर अखिलेश यादव यांनी सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे संकेत दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून अखिलेश यांनी काही जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते. मात्र आता जागावाटपावर सहमती झाल्यानंतरच अखिलेश यादव यांनी या यात्रेला हजेरी लावली.
तिन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले
रविवारी अखिलेश या यात्रेत सहभागी झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर यात्रेमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी एकत्र सेल्फी घेतले. यावेळी राहुल गांधी, प्रियांका गाधी आणि अखिलेश अशा तिघांनीही यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.
अखिलेश यादव काय म्हणाले?
“आगामी काही दिवसांत आपल्यापुढे लोकशाही वाचवण्याचे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे सर्वांत मोठे आव्हान असणार आहे. आज मला भाजपा हटवा, देश वाचवा, संकट मिटवा हा एकच संदेश द्यायचा आहे,” असे अखिलेश यादव म्हणाले.