पीटीआय, लखनौ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजवादी पक्षाचे संस्थापक, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मुलायमसिंह यादव यांचे सोमवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. यादव यांच्या निधनामुळे उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात मुलायमसिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाच्या अधिकृत ‘ट्विटर’ खात्यावरून, ‘‘माझे वडील आणि सर्वाचे ‘नेताजी’ आता हयात नाहीत,’’ अशा संदेशाद्वारे मुलायमसिंह यांच्या निधनाची दिली. मुलायमसिंह यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळ गाव सैफई येथे मंगळवारी दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. मुलायमसिंह यांना ऑगस्टमध्ये मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रक्तदाब खालावल्याने आणि शरीरातील प्राणवायूचे प्रमाण घटल्याने त्यांना २ ऑक्टोबर रोजी अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

मुलायमसिंह यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी उत्तर प्रदेशातील इटावाजवळील सैफई येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी १९९२ मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून हा पक्ष राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. मुलायम यांनी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. विद्यार्थी आंदोलनातही त्यांनी भाग घेतला होता. राज्यशास्त्राची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ अध्यापनही केले होते. १९६७ मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली आणि अनेक विरोधी नेत्यांप्रमाणे मुलायम यांनीही तुरुंगवास भोगला. मुलायम यांनी १९९६ ते १९९८ पर्यंत संरक्षणमंत्रीपद भूषविले. १९८९-९१, १९९३-९५ आणि २००३-०७ असे तीन वेळा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मुलायम दहा वेळा आमदार म्हणून, तर सात वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी यादव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुलायमसिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्या म्हणाल्या, ‘‘मुलायमसिंह यांच्या निधनाने देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या मुलायम यांचे कर्तृत्व विलक्षण आहे. ते खरे ‘भूमिपुत्र’ होते. त्यांची नाळ सदैव सामान्यांशी जोडलेली होती. सर्वपक्षीय नेत्यांच्या मनात त्यांना आदराचे स्थान होते.’’

मुलायमसिंह यांच्या निधनाचे वृत्त समजताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेदांता रुग्णालयात मुलायम यांचे पुत्र अखिलेश यादव यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि शोक प्रकट केला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद तीनदा भूषवणाऱ्या मुलायमसिंह यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला. 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रिजेश पाठक आणि राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक लालूप्रसाद यादव यांच्यासह अनेक नेते आणि मंत्र्यांनीही मुलायमसिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

राजकारणाचे नुकसान : पंतप्रधान

मुलायमसिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले की मी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना व ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना माझा मुलायमसिंह यांच्याशी अनेकदा संवाद झाला होता. आमच्यात जिव्हाळय़ाचे नाते होते. त्यांचे विचार ऐकण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असायचो. त्यांच्या निधनाने राजकारणाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

राजकीय कारकीर्द

’ मुलायम यांनी १९९६ ते १९९८ पर्यंत संरक्षणमंत्रीपद भूषविले. १९८९-९१, ९३-९५ आणि २००३-०७ असे तीन वेळा मुख्यमंत्री होते. 

’ मुलायम दहा वेळा आमदार म्हणून तर सात वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

’ अनेक दशकांपासून ते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय राहिले, मात्र उत्तर प्रदेश हेच त्यांच्या राजकारणाचे क्षेत्र राहिले.

’ अगदी तरुण वयात ते समाजवादी नेते लोहिया यांच्या विचारांनी प्रभावित झाले होते. 

’ समाजवादी पक्षाचे अध्यक्षपद २०१७ मध्ये त्यांचे पुत्र अखिलेश यांच्याकडे गेले, मात्र मुलायम पक्षकार्यकर्त्यांत कायम ‘नेताजी’ म्हणून लोकप्रिय राहिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samajwadi party founder mulayam singh yadav passed away amy