रामपूरचे माजी आमदार आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आझम खान यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. रामपूरच्या विशेष एमपी-एमएलए कोर्टाने बुधवारी हेट स्पीच प्रकरणात निर्णय दिला. या निर्णयानुसार, सपा नेता आझम खान यांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. याच हेट स्पीचमुळे आझम खान यांची आमदारकी गेली होती.
आझम खान यांच्या द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी बुधवारी रामपूरच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली. बुधवारी न्यायालयाने आझम खान यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. मात्र, याआधी रामपूरच्या कनिष्ठ न्यायालयाने त्यांना याच प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र आता विशेष खासदार-आमदार न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. कनिष्ठ न्यायालयाने गेल्या वर्षी २७ ऑक्टोबरला सपा नेत्याविरोधात निकाल दिला होता.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर आझम खान यांचे वकील विनोद शर्मा म्हणाले, “आम्हाला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. ज्या द्वेषपूर्ण भाषणाच्या प्रकरणांमध्ये आम्हाला शिक्षा झाली होती, आता न्यायालयाने आम्हाला निर्दोष घोषित केले आहे. जे १८५ प्रकरणांशी संबंधित होते, त्यावर न्यायालयाचा निर्णय आला आहे.” गेल्या वर्षी या प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर आझम खान यांच्या आमदारकीचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. यानंतर रामपूरमध्ये पोटनिवडणूक झाली.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या प्रक्षोभक भाषणाप्रकरणी आझम खान यांच्याविरोधात मिलक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासासह २५ हजारांचा दंड ठोठावला होता. मात्र, शिक्षेची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच आझम खान यांना जामीनही मिळाला होता. आझम खान यांच्याविरोधात कलम १५३ ए, ५०५ अ आणि १२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या शिक्षेविरोधात त्यांनी विशेष कोर्टात दाद मागितली होती. आता विशेष कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे.