लोकसभेत अठरा खासदार असणाऱ्या द्रमुकने मनमोहनसिंग सरकारचा अधिकृतपणे पाठिंबा काढून घेतल्यानंतर मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष बुधवारी आक्रमक झाला. आपल्या २२ खासदारांनिशी सरकारला बाहेरून पाठिंबा देत असलेल्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यात मुलायमसिंह यादव यांच्याविषयी काढलेल्या अपशब्दांवरून केंद्रीय पोलाद मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याच्या मागणीचा प्रामुख्याने समावेश होता. पण, कुठलाही धोका नसल्याचा निर्वाळा सरकारने देत उलटसुलट चर्चा निराधार ठरविण्याचा प्रयत्न केला.
मनमोहन सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेण्याविषयीचे राष्ट्रपतींना पत्र दिल्यानंतर द्रमुकच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन बुधवारी राजीनामे सादर केले. बेनीप्रसाद वर्मा यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग तसेच सोनिया गांधी यांची भेट घेऊन वादग्रस्त वक्तव्याबद्दल भूमिका स्पष्ट केली आणि आपण केलेल्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो, असे प्रसिद्धी माध्यमांपुढे येऊन सांगितले. मात्र, त्यामुळे समाजवादी पक्षाचे आणि मुलायमसिंह यादव यांचे समाधान झाले नाही.

‘सरकारला धोका नाही’
दुसरीकडे सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांनी जनता दल संयुक्तचे अध्यक्ष शरद यादव यांची भेट घेतली.
बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सरकारला आपला पाठिंबा कायम असेल, असे स्पष्ट केले. तृणमूल काँग्रेसच्या ममता बनर्जी यांनीही विदेशी धोरणावर आपला पक्ष सरकारचे समर्थन करेल, असे संकेत दिले.  हे सरकार आपल्या अंतर्कलहाने गडगडेल, असे सांगून भाजपनेही सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडण्यात स्वारस्य दाखविलेले नाही. समजा अविश्वास प्रस्ताव आलाच तर द्रमुक सरकारच्या विरोधात मतदान करणार नाही, असे आश्वासन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी करुणानिधींकडून मिळविल्याचे समजते. त्यामुळे सरकारला कोणताही धोका नाही, असे ठाम वक्तव्य पत्रकार परिषदेत चिदंबरम, कमलनाथ आणि तिवारी यांना करणे शक्य झाले.

समाजवादी-भाजपचे अहो रुपम..
भाजप आणि समाजवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकमेकांच्या सर्वोच्च नेत्यांची प्रशंसा करीत अप्रत्यक्षपणे ‘जवळीकी’चे संकेत दिले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सर्वांना सोबत घेऊन सरकार चालवायचे. पण तसे करण्यात मनमोहन सिंग अपयशी ठरत असल्याची टीका मुलायमसिंह यादव यांचे बंधू व राज्यसभेतील सपाचे गटनेते प्रा. रामगोपाल यादव यांनी केली.
विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी मुलायमसिंह यादव यांच्याविषयी अनुद्गार काढणाऱ्या बेनीप्रसाद वर्मा यांनी विशेषाधिकाराचे हनन केल्याचा आरोप केला.

मुलायम-पवार भेट
मुलायमसिंह यादव यांनी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांनीही यूपीए सरकारमधून बाहेर पडावे, असा या भेटीमागचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे. निदान तसा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न मुलायमसिंह यादव यांनी पवार यांची भेट घेऊन केला. ही तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी असल्याचा दावा मुलायमसिंह यांचे कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या सपाच्या एका ज्येष्ठ खासदाराने केला.

Story img Loader