Aligarh Mosque: देशभरात सध्या होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज १३ मार्च रोजी होलिका दहन झाल्यानंतर उद्या १४ मार्च रोजी होळी (रंगपंचमी) साजरी केली जाणार आहे. अशात उद्या रमजानच्या दुसऱ्या शुक्रवारची नमाज देखील असणार आहे. त्यामुळे दोन्ही सण शांततेत साजरे व्हावेत यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमधील मशिदी ताडपत्रीने झाकण्यात आल्या आहेत. जेणेकरून मशिदींवर रंग पडू नये. यासाठी ताडपत्रीने झाकलेल्या मशिदींचे काही फोटोही समोर आले आहेत. दरम्यान संभल, शाहजहांपूर, अलीगड सारख्या संवेदनशील जिल्ह्यांमध्ये विशेष दक्षता बाळगली जात आहे.
यापूर्वी, संभलमध्ये, होळीच्या मिरवणुकीच्या मार्गावर येणाऱ्या सर्व मशिदींना ताडपत्रींनी झाकण्याचा निर्णय परस्पर संमतीने घेण्यात आला होता. आता अलीगडमध्येही मशिदींना ताडपत्रींनी झाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अलिगड पोलिसांनी मशिदींना ताडपत्रीने झाकण्याचे काम सुरू केले आहे.
अधिकारी काय म्हणाले?
याचबरोबर अलीगडमध्ये मशिदींबाहेर अतिरिक्त पोलीस दल तैनात केले जाणार आहे. अलीगढमध्ये ९ ठिकाणी पोलीस तैनात केले जातील. अलिगड शहराचे सहाय्यक जिल्हाधिकारी अमित कुमार भट्ट म्हणाले की, “मशिदींना ताडपत्रीने झाकण्याचे काम सर्वसामान्यांच्या मदतीने केले जात आहे. सर्वजण यामध्ये सहकार्य करत आहेत. होळीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.”
शाहजहांपूरमधील ६७ मशिदी ताडपत्रीने झाकल्या
शाहजहांपूरमध्ये होळीच्या (रंगपंचमी) दिवशी लाट साहेबांची मिरवणूक काढली जाते आणि त्यामुळे शहरातील सुमारे ६७ मशिदी आणि दर्ग्यांना ताडपत्रीने झाकण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक म्हणाले की, शहरातून निघणाऱ्या पारंपारिक लाट साहेब मिरवणुकीच्या १० किमी मार्गात असलेल्या सर्व मशिदी आणि दर्ग्यांवर रंग पडू नयेत म्हणून त्यांना काळ्या फॉइल आणि ताडपत्रीने झाकण्यात आले आहे.
काय असते लाट साहेबांची मिरवणूक?
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शाहजहांपूरमध्ये लाट साहेबांच्या मिरवणुकीची परंपरा सुरू झाली. यामध्ये, इंग्रजांचे प्रतीक म्हणून, एका व्यक्तीला लाट साहेब बनवले जाते आणि म्हशीच्या गाडीतून फिरवले जाते. राग व्यक्त करण्यासाठी, यावेळी त्याला झाडूने मारले जाते. याचबरोबर त्या बूट आणि चप्पलांचा हार घातला जातो. ज्या व्यक्तीला लाट साहेब व्हायचे असते तो संमतीने मिरवणुकीत येतो, त्या बदल्यात त्याला ५० हजार रुपये दिले जातील.