Sambhal Holi Processions Time : यंदा धुलीवंदनाचा सण शुक्रवारी (१४ मार्च) साजरा केला जात आहे. प्रत्येक आठवड्यातील शुक्रवारी (जुम्मा) बहुसंख्य मुस्लीम लोक सामूहिक नमाज पठण करतात. अशा वेळी हिंदू व मुस्लीम समुदायांमधील लोक आपापले उत्सव साजरे करण्यासाठी आमनेसामने आले तर तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे देशभर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील संभलसारख्या ठिकाणी पोलिसांनी अधिक फौजफाटा तैनात केला आहे. उत्तर भारतात हिंदू समुदायातील लोक धुलीवंदनाच्या दिवशी अनेक ठिकाणी मिरवणुका काढतात. मात्र, यावेळी संभलमध्ये अशा मिरवणुका दिवसभर काढता येणार नाहीत.

संभलचे पोलीस अधीक्षक के. के. बिश्नोई यांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितलं की शहरात सर्व ठिकाणी मिरवणुका काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या मिरवणुका दुपारी २.३० वाजण्याच्या आत पूर्ण कराव्यात. दुपारी २.३० नंतर नमाज पठणास परवानी देण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक के. के. बिश्नोई काय म्हणाले?

के. के. बिश्नोई म्हणाले, “होळीसाठी मिरवणुका काढण्याची परवानगी आहे. शहराच्या सर्व भागात होळी साजरी केली जाईल. लोकांनी दुपारी अडीच वाजेपर्यंत होळी साजरी करावी. त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मला आशा आहे की ही होळी सर्वांना आनंद देईल. मात्र दुपारी, अडीचनंतर शुक्रवारची नमाज (जुम्म्याची नमाज) अदा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.”

दरम्यान, गुरुवारी (१३ मार्च) धुलीवंदनाच्या पूर्वसंध्येला संभलचे सर्कल अधिकारी अनुज चौधरी यांच्या नेतृत्वाखाली संभलमधील कायदा व सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी सर्व पोलीस फौजफाट्यासह फ्लॅग मार्च करण्यात आला.

संभलमधील मशिदी ताडपत्रीने झाकल्या

तत्पूर्वी, संभलमधील मुस्लीम समुदायाने रंगपंचमीच्या दिवशी काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीच्या मार्गात येणाऱ्या १० मशिदींना ताडपत्रीने झाकण्याचा निर्णय घेतला आहे. होळीच्या आदल्या दिवशीच या मशिदी झाकण्यात आल्या. संभलचे वरिष्ठ पोलीस आयुक्त म्हणाले की, धार्मिक स्थळांचे संरक्षण परस्पर संमतीने केले जाईल. हिंदू समुदायाने दुपारी २.३० वाजेपर्यंत रंगपंचमी खेळावी. त्यानंतर मुस्लिम लोक नमाज पठण करतील. दरम्यान रंगपंचमीच्या दिवशी काढल्या जाणाऱ्या चौपैय्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.