Sambhal Land scam : उत्तर प्रदेशच्या संभलमधील चंदौसीच्या लक्ष्मण गंज परिसरामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई करताना तब्बल १५० वर्षे जुनी पायऱ्या असलेली विहीर आढळून आली होती. मात्र या विहिरीच्या परिसरात आता एक जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. एका खोट्या मृत्युपत्राद्वारे येथील ११४ प्लॉट्स विकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हे प्लॉट्स अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तींना विक्री करण्यात आले आहेत. वरिष्ठ जिल्हा अधिकार्यांनी रविवारी याबद्दल माहिती दिली की, आता या प्लॉट्सच्या मालकीचा पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांकडून तपास केला जात आहे.
त्यांनी सांगितले की हा भाग सुरुवातीला लक्ष्मी गंजचा भाग होता पण नंतर शहर विकसीत होत गेले आणि नवीन मुघलपूरा वसाहत उदयास आली.
मोहम्मद युसूफ सैफी यांची विधवा पत्नी गुलनाज बी (५४) यांना शुक्रवारी नोटीस देण्यात आल्यानंतर विहिरीवर बांधलेले त्यांचे घर रिकामे करावे लागले. त्यानंतर त्यांनी आमना बेगम आणि तिचा नवरा जहीरूद्दीन आणि इतरांविरोधात धमकावल्याची आणि फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. चंदौसी येथील पोलीस अधिकारी रेणू सिंह यांनी या प्रकरणात तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.
गुलनाझ बी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी १०३ स्क्वेअर किलोमीटरचा प्लॉट २०१६ मध्ये आमना बेगमकडून खरेदी केला होता. त्याने प्रशासनाकडून घर बांधण्याची परवानगी देखील घेतली होती, पण शुक्रवारी त्यांना त्यांचे घर सोडावे लागले आहे. तीन आठवड्यांपूर्वी या घराच्या घाली असलेल्या विहिरीचे एएसआय (Archaeological Survey of India) कडून खोदकाम सुरू करण्यात आले आहे. गुलनाझ यांनी सांगितलं की, त्या आमना आणि तिच्या पतीकडे गेल्या होत्या मात्र त्यांच्याकडून त्यांच्या कुटुंबियांना धमकी देण्यात आली.
संभलचे जिल्हाधिकारी राजेंद्र पेन्सिया आणि एसपी क्रिशन कुमार बिश्नोई यांनी केलेल्या सर्वेक्षणात उघड झाला आहे की, ही जमीन एएसआयने संरक्षित केलेल्या चंद्रेश्वर महादेव मंदिराची आहे. या मंदिराची ८९ बिघे जमीन होती. पण सध्या मंदिराच्या ताब्यात अवघे १९ बिधे जमीन शिल्लक आहे. तर सुमारे ५० बिघे जमीन चुकीच्या पद्धतीने भाड्याने दिल्याचे आढळून आले आहे. परिसरात लावण्यात आलेल्या एएसआयच्या बोर्डचेही नुकसान करण्यात आले आहे.
बिश्नोई यांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती दिली की, त्यांना गुलनाझ यांची तक्रार प्राप्त झाली आहे आणि जमीनीचे कागदपत्र तीन दिवसात तपासले जातील आणि त्यानंतर एफआयआर दाखल केला जाईल. ऐतिहासिक रेकॉर्ड्सच्या आधारावर ही केस सोडवली जाईल. चंद्रेश्वर महादेव मंदिराच्या ५० बिघे जमिनीचे भाडे करार रद्द केले जातील. तसेच त्यांनी पुढील कारवाई केली जात असल्याचेही सांगितले.
हेही वाचा>> अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त भाविक महाकुंभमध्ये सहभागी होणार; २ लाख कोटींच्या उल…
विहिरीबद्दल काय माहिती आहे?
लक्ष्मण गंज परिसरामध्ये २१ डिसेंबर रोडी अतिक्रमणविरोधी कारवाई करताना आढळलेली ही विहीर १५० वर्ष जुनी असल्याचे सांगितले जात आहे. याचे बांधकाम सुमारे ४०० स्क्वेअर मिटर असून यामध्ये तीन मजले आढळून आले आहेत. या तीन स्तरांपैकी एक मार्बल वापरून बांधलेला आहे आणि दोन हे वीटांनी बांधलेले आहेत. या इमारतीत चार खोल्या आणि एक विहीर आढळून आली आहे. या विहिरीमध्ये आढळलेला बोगदा हा इंग्रजांच्या राजवटीदरम्यान १८५७ च्या उठावात पळून जाण्यासाठीचा रस्ता म्हणून वापरण्यात आल्याचा अंदाज एएसआयकडून व्यक्त केला जात आहे.
ही विहिर आढळून आल्यानंतर या भागाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. यानंतर संभलच्या जिल्हा प्रशासन आणि एएसायच्या देखरेखीखाली या भागात खोदकाम सुरू आहे.