Sambhal Violence Dawood Ibrahim Connection: उत्तर प्रदेशातील संभलमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. या प्रकरणी आता उत्तर प्रदेश पोलिसांनी नुकतेच ४४०० हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये दुबईस्थित शारिक साठा हा या हिंसाचाराचा सूत्रधार होता, असा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. शारिक साठा सध्या दुबईमध्ये असून, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेश पोलिसांनी संभल हिंसाचाराप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात सांगितले की, शारिक साठाची दिल्लीत एक टोळी होती. या टोळीच्या माध्यमातून त्याने दिल्ली-एनसीआरमध्ये ३०० हून अधिक वाहने चोरली होती. त्याचबरोबर शारिकचा दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध आहे. तो बनावट पासपोर्टचा वापर करून देशाबाहेर पळून गेला आहे. दरम्यान या आरोपपत्रात ७९ आरोपींची नावे आहेत आणि हे सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहेत.

पोलिसांनी काय सांगितले?

“संभल हिंसाचाराच्या तपासादरम्यान शारिक साठाचा सहभाग उघडकीस आला आणि आम्हाला मिळालेल्या पुराव्यांवरून आपण असे म्हणू शकतो की त्याने हिंसाचार घडवून आणला. आरोपपत्रांमध्ये साठाच्या टोळीतील सदस्यांचा समावेश आहे. हे पहिलेच आरोपपत्र आहे आणि तपास पुढे जाईल तसे पुरवणी आरोपपत्र दाखल करू,” अशी माहिती संभलचे पोलीस अधिक्षक कृष्ण कुमार बिश्नोई यांनी दिल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

तपासात, संभलमधील अनेकांना संशयीत पद्धतीने पैसे हस्तांतरित झाल्याचे समोर आले आहे. याचबरोबर हिंसाचाराच्या ठिकाणी परदेशी बनावटीचे काडतुसेही आढळून आली आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, पाचपैकी चार जणांचा मृत्यू झालेल्या गोळीबारासाठी साठाचे सहकारी जबाबदार होते. दरम्यान पाचव्या मृत्यूसाठी कोणताही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.

काय आहे प्रकरण?

२४ नोव्हेंबर २०२४ रोजी मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या गोंधळामुळे दगडफेक, जाळपोळ, गोळीबार आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक पोलिस जखमी झाले होते. ही घटना केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली होती.