Sambhal Violence : उत्तर प्रदेश राज्यातील संभल शहरात २४ नोव्हेंबर रोजी मशिदीवरून हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारानंतर संभल येथे मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला होता, तर काही पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते. दरम्यान, संभल हिंसाचार प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. या हिंसाचार प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने आज (२३ मार्च) शाही जामा मशिदीचे प्रमुख जफर अली यांना अटक केली आहे.
गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणात जफर अली यांची एसआयटीने चौकशी केली होती. या चौकशीनंतर आता एसआयटीने ही कारवाई करत जफर अली यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात निदर्शने सुरु झाली होती. याचवेळी हिंसाचार उसळला होता आणि तेव्हापासून अद्यापही उत्तर प्रदेशातील या संभल शहरात तणाव आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या संभळ हिंसाचारातील १२ पैकी सहा प्रकरणात एसआयटीने चार हजारांपेक्षा जास्त पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं. या आरोपपत्रानुसार या प्रकरणात एकूण १५९ आरोपी होते. हिंसाचाराच्या ठिकाणी आणि इतर ठिकाणांहून जप्त केलेली शस्त्रे युनायटेड किंग्डम, अमेरिका, जर्मनी आणि चेक रिपब्लिकमध्ये बनवण्यात आली होती, असं आरोपपत्र नमूद करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान, होळीपूर्वी मशिदीत रंग किंवा तोडफोड होऊ नये म्हणून जामा मशिदीला ताडपत्रीने झाकण्यात आलं होतं. होळीपूर्वी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मार्च काढला होता, तर प्रशासन जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहे. दरम्यान, आज शाही जामा मशिदीचे प्रमुख जफर अली यांना अटक करण्यात आल्यानंतर शहरात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.