Sambit Patra Gautam Adani US charges 250 million USD bribe plot : भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची लाच देणे, गुंतवणूकदार आणि बँकाँशी खोटे बोलणे आणि त्यातून अब्जावधी रुपये गोळा केल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर केला आहे. त्यामुळे आता गौतम अदाणी यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अदाणी समूहावर आता सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तर यावर राहुल गांधी यांनी गौतम अदाणींवर आरोप केले. राहुल गांधींच्या या टीकेवर आता भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींची पत्रकार परिषद झाल्यानंतर संबित पात्रा यांनीही तत्काळ पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं.
ज्या राज्यांनी सौर ऊर्जा सौद्यांसाठी अदानी समूहाकडून कथितपणे लाच घेतल्याचे अमेरिकेच्या आरोपपत्रात नमूद केले आहे, त्या राज्यांवर विरोधी पक्षांची सत्ता होती. तसंचं, राहुल गांधींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावाही संबित पात्रा यांनी केला.
“अदानी समूहाविरुद्ध अमेरिकेच्या आरोपांमध्ये नमूद केलेल्या चार राज्यांपैकी एकाही राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री नव्हता. छत्तीसगड आणि तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष सत्तेत होते”, असं पात्रा म्हणाले.
अमेरिकेच्या वकिलांनी सांगितलं की अदानी समूहाने २०२१-२३ दरम्यान राज्य वीज वितरण कंपन्यांशी करार करण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना अडीच लाख कोटींची लाच दिली. अदानी समूहाने मात्र हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. ओडिशा (तेव्हा नवीन पटनायक यांच्या बीजेडीचे सरकार), तामिळनाडू (डीएमके अंतर्गत), छत्तीसगढ (काँग्रेस), आणि जम्मू आणि काश्मीर (केंद्रीय शासनाखाली) या राज्यांची नावे अमेरिकेच्या आरोपात आहेत. तेव्हा आंध्र प्रदेशचे नेतृत्व जगन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसकडे होते.
आई-मुलगा जामिनावर बाहेर
राहुल गांधींवर ताशेरे ओढत पात्रा म्हणाले की, भारतावर आणि देशाचे रक्षण करणाऱ्या संरचनेवर हल्ला करणे ही विरोधी पक्षांची नेहमीची खेळी आहे. राफेलचा मुद्दा २०१९ मध्ये राहुल गांधींनी अशाच पद्धतीने उचलून धरला होता. मोठा खुलासा होईल असा दावा त्यांनी केला होता. कोविड महामारीच्या काळात ते लसीबाबत अशाच पद्धतीने पत्रकार परिषदा करायचे”, असं संबित पात्रा म्हणाले. काँग्रेस न्यायपालिकेचे काम करत असल्याच्या राहुल गांधींच्या वक्तव्यावर पात्रा यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस खासदार आणि सोनिया गांधी हे दोघेही जामिनावर बाहेर आहेत यावर भर दिला.
हेही वाचा >> Gautam Adani Fraud: अदाणी समूहानं जारी केलं अमेरिकेतील आरोपांवर निवेदन; भ्रष्टाचार प्रकरणाबाबत मांडली भूमिका!
राहुल गांधी काय म्हणाले होते?
राहुल गांधी म्हणाले, “भाजपाला मिळणारा सगळा निधी हा अदाणींकडून येतो. भाजपाचे आर्थिक व्यवहार त्यांच्याच हातात आहेत. पंतप्रधानांनी ठरवलं तरी ते अदाणींवर कुठल्याही प्रकारची कारवाई करू शकत नाहीत. अदाणी यांनी देश बळकावला आहे. देश त्यांच्या मुठीत आहे. देशातील विमानतळं, बंदरं, संरक्षण यंत्रणा अदाणींच्या ताब्यात आहे. सगळीकडे अदाणींची केंद्र सरकारबरोबर भागिदारी आहे. एका बाजूने अदाणी आणि दुसऱ्या बाजूने नरेंद्र मोदी मिळून आपला देश लुटत आहेत. मोदी व भाजपा त्यांच्या पापात सहभागी आहेत. त्यामुळे मोदी त्यांना अटक करणार नाहीत. मुळात मोदींमध्ये तेवढी हिंमत व क्षमता नाही. कारण ज्या दिवशी मोदी व आपलं सरकार गौतम अदाणी यांना अटक करेल. त्या दिवशी मोदी देखील तुरुंगात जाऊ शकतात”.
अदाणींनी जाहीर केले निवेदन
अदाणी समूहाकडून जारी करण्यात आलेल्या स्पष्टीकरणाच्या निवेदनात भ्रष्टाचाराच्या सर्व आरोपांचं खंडन करण्यात आलं आहे. “अमेरिकेच्या विधी विभागाकडून ‘अदाणी ग्रीन्स’च्या संचालकांवर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून आम्ही ते सर्व आरोप फेटाळत आहोत”, असं या निवेदनात सुरुवातीलाच नमूद करण्यात आलं आहे.
d