राष्ट्रपतींना निमंत्रण न देता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत २८ मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत असल्याचा निषेध करत या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय १९ भाजपेतर विरोधी पक्षांनी बुधवारी घेतला. यामुळे या सोहळ्यावरून वाद तीव्र झाला आहे. नव्या इमारतीच्या उद्घाटन समारंभाला राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यात आलेले नसल्याने विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. केंद्र सरकारची भूमिका प्रजासत्ताक भारताच्या प्रमुखांचा आणि संविधानाचा अपमान आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी बुधवारी संयुक्त निवेदनाद्वारे केली. विरोधकांच्या या भूमिकेवर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनी सडकून टीका केली आहे. या आधीच्या घटनांचा दाखला देत संबित पात्रा यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रोजी नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार असल्याने विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी संसद किंवा विधानभवनाचं उद्घाटन केलं पाहिजे. त्यांच्या दांभिकतेचे मी खाली काही उदाहरणे दिली आहेत”, असं ट्वीट संबित पात्रा यांनी केलं आहे.

संबित पात्रा यांनी ट्वीट थ्रिएटमध्ये काही उदाहरणे दिली आहेत. त्यामध्ये काँग्रेसच्या काळात विविध विधानभवनाच्या भूमीपूजनाला, उद्घाटनाला काँग्रेसचे राष्ट्रीय फळीतील नेतेमंडळी गेली होती. त्यांच्या हस्ते या वास्तूंचं भूमिपूजन वा उद्घाटन झाले होते. विविध वृत्तसंस्थांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांचा दाखला देत संबित पात्रांनी हे ट्विट्स केले आहेत.

माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कर्नाटकच्या विधानसभेचे भूमिपूजन केले होते. राज्यपालांचे हस्ते हे भूमिपूजन का झाले नाही?

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते १९८१ साली महाराष्ट्र विधानसभवनाचं उद्घाटन झालं होतं. तेव्हा त्यांनी (काँग्रेस) बहिष्कार का टाकला नाही?

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संसद भवनातील वाचनालय इमारतीचं भूमिपूजन १९८७ साली केलं होतं. तेव्हा कोणीही बहिष्कार टाकला नाही. का?

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संसद भवनाच्या अतिरिक्त इमारतीचं २४ ऑक्टोबर १९७५ साली उद्घाटन केलं होतं. तेव्हाही कोणी बहिष्कार टाकला नाही.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधी यांच्यासह मणिपूरच्या नव्या विधानभवनाचं उद्घाटन केलं होतं. सोनिया गांधी यांनी कोणत्या अधिकार क्षेत्रात हे उद्घाटन केलं? त्या राष्ट्रपती होत्या का? की मणिपूरचे मुख्यमंत्री की मणिपूरच्या राज्यपाल होत्या?

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तमिळनाडू विधानभवनाचं उद्घाटन केलं होतं. तामिळनाडूच्या राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन का झालं नाही?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल विधानभवनातील प्लाटिनम जुबिली मेमोरियल इमारतीचं उद्घाटन केलं. तेव्हा टीएमसी नेत्यांनी बहिष्कार का टाकला नाही?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानभवनातील संशोधन केंद्राचे उद्घाटन केले होते. तेव्हा आपच्या नेत्यांनी बहिष्कार का टाकला नाही?

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी बिहार विधान परिषदेतील सेंट्रल हॉलचे उद्घाटन केले. तेव्हा जेडीयू नेत्यांनी बहिष्कार का घातला नाही?

सोनिया आणि राहुल गांधी यांनी छत्तीसगडच्या नव्या विधानभवनाचे भूमीपूजन केले होते. कोणत्या अधिकारक्षेत्रात त्यांनी हे भूमिपूजन केलं? छत्तीसगडमध्ये त्यांच्यांकडे कोणतंही संवैधानिक पद नव्हतं. तेव्हा काँग्रेस नेत्यांनी बहिष्कार का घातला नाही.

अशी विविध उदाहरणं देऊन संबित पात्रा यांनी देशातील विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडलं आहे. विरोधकांकडून यावर काय प्रतिक्रिया येतेय हे पाहावं लागणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambit patra tweets on the opposition boycott of inauguration of the new parliment building sgk