समलिंगी विवाह कायद्यासाठी सर्वोच्च न्यायालयात वादळी सुनावणी सुरू आहे. आज सुनावणीचा सहावा दिवस होता. आजच्या दिवशीही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारची बाजू लावून धरली. जोडीदार निवडीच्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित करून याचिकाकर्त्यांनी समलिंगी विवाह कायद्याची मागणी केली आहे. मात्र, “या विवाहाला मान्यता दिल्यास अनैतिक संबंधांनाही संरक्षण मिळेल”, असं तुषार मेहता यांनी म्हटलं आहे.
“समजा, एखादा व्यक्ती प्रतिबंधित असलेल्या नात्यातच (Degrees of Prohibited Relationship) आकर्षित झाला तर? समजा, एखादा व्यक्ती आपल्या बहिणीलाच आकर्षित झाला तर ते म्हणू शकतात की आम्ही प्रौढ आहे, आम्ही आमच्या खासगी आयुष्यात काहीही करू शकतो. आम्हाला जोडीदार निवडीचा अधिकार आहे. याच युक्तिवादाच्या आधारे कोणी आव्हान देऊ शकत नाही का? या विवाहासाठी निर्णय घेणारे तुम्ही कोण आहात?” असा सवाल सॉलिसिटर जनरल यांनी उपस्थित केला.
हेही वाचा >> आयुर्वेद-ॲलोपॅथी डॉक्टरांचे काम भिन्न; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी, समान वेतनाचा आदेश रद्द
बहिणीशी लग्न करण्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, “ही फार दूरची गोष्ट आहे.” त्यावर तुषार मेहता यांनीही तत्काळ उत्तर देत, “समलिंगी विवाहही आम्हाला फार दूरचीच गोष्ट वाटत होती” असं म्हटलं. सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, एस. रवींद्र भट, हिमा कोहली आणि पीएस नरसिंहा यांच्या घटनापीठासमोर आज सहाव्या दिवशी सुनावणी झाली
तुषार मेहतांनी समलिंगी विवाहावरून बहुपत्नीत्वाचा मुद्दाही अधोरेखित केला. “जोडीदार निवडीवरून माझी निवड बहुपत्नीत्व आहे, असंही लोक म्हणू शकतात”, असं मेहता म्हणाले. “लग्नाविषयीचे नियम सार्वत्रिक आहे. हे नियम कायदेशीर तयार केले नव्हते तेव्हाही ते स्वीकारले होते. हा एक आदर्श कायदा होता. समलिंगी विवाहांना परवानगी द्यायची झाली तर तब्बल १६० तरतुदींवर परिणाम होईल, त्यामुळे देशाच्या वैधानिक चौकटीत मतभेद निर्माण होऊ शकतील,” असं तुषार मेहता यांनी आज सर्वोच्च न्यायालयात नमूद केलं.