कंपनीतील कामामुळे कर्मचाऱ्यांना कर्करोगाचे निदान होणे आणि त्यामुळे असंख्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू होणे ही धक्कादायक गोष्ट आहे. पण मोबाईल बाजारात आघाडीवर असलेल्या सॅमसंग या कंपनीमध्ये ही घटना घडली आहे. संगणक चीप आणि डिस्प्ले तयार करण्याच्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कंपनीच्या २४० जणांना विविध प्रकारचे कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यातील ८० जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. आपल्या कुटुंबातील व्यक्ती कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यूमुखी पडल्याने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी १० वर्षांपासून मोठा लढा उभारला होता. त्याला अखेर यश आले असून आता मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई मिळणार आहे.

सॅमसंग ही दक्षिण कोरीयाची कंपनी असून पिडीतांना जवळपास ९६ लाख रुपये दिले जाणार आहेत असे कंपनीने सांगितले आहे. आपण कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात अपयशी ठरलो आहोत याबद्दल कंपनीने खेद व्यक्त केला. तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला उद्भवू शकणाऱ्या धोक्यांचा अंदाज न आल्याने आम्ही दिलगीर आहोत असे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी किनान किम यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आजारी असलेले कर्मचारी आणि मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. कीम यांनी आजारपणामुळे जीव धोक्यात आलेले कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिया यांची आम्ही माफी मागतो असेही कीम यावेळी म्हणाले. काम करताना केलेल्या रसायनांच्या वापरामुळे आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर ही वेळ आल्याचा आरोप आजारी व्यक्तींच्या कुटुंबियांनी केला होता. त्यांना काही प्रमाणात न्याय मिळाला असे म्हणता येईल.