तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे सुपुत्र क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली होती. यामुळे देशभरातून उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर टीकास्त्र सोडलं जात होते. आता द्रमूकचे खासदार ए राजा यांनी सनातन धर्माची तुलना ‘एचआयव्ही’सारख्या आजाराशी केली आहे. यामुळे पुन्हा वादाला तोंड फुटलं आहे.
ए राजा म्हणाले, “सनातन आणि विश्वकर्मा योजना वेगळ्या नाहीत. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली. उदयनिधी यांची भूमिका मवाळ होती. पण, समाजात घृणास्पद असं समजले जाणारे हे आजार नाहीत. कुष्ठरोग आणि एचआयव्हीसारखे आजार घृणास्पद आहेत.”
हेही वाचा : “जोपर्यंत भक्त जिवंत आहेत, तोपर्यंत कोणीही…”, स्मृती इराणींचं विधान
“खरेतर, सनातन धर्माकडे कुष्ठरोग आणि एचआयव्हीसारख्या आजासारखं पाहिले पाहिजे. मी सनातन धर्मावर कोणाशीही चर्चा करण्यास तयार आहे,” असं आव्हान ए राज यांनी दिलं. ‘इंडिया टुडे’नं याबाबत वृत्त दिलं आहे.
उदयनिधी स्टॅलिन काय म्हणाले?
“सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलच पाहिजे. तसेच, सनातन धर्मालाही संपवायचं आहे,” असं विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं होतं.
“योग्य प्रत्युत्तर देण्याची गरज आहे”
उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाष्य केलं आहे. “सनातन धर्मावरून तीव्र झालेल्या वादावर, योग्य प्रत्युत्तर देण्याची गरज आहे”, असे मत पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी मंत्री परिषदेच्या बैठकीत मांडले.