तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे सुपूत्र क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मांची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली आहे. या विधानानंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. तर, उदयनिधी स्टॅलिन आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.
एका कार्यक्रमात बोलताना उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, “सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलच पाहिजे. तसेच, सनातन धर्मालाही संपवायचं आहे.”
यावर भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी ट्वीट करत उदयनिधी स्टॅलिन यांना लक्ष्य केलं. “मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे पुत्र आणि द्रमुक सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली आहे. सनातन धर्माला फक्त विरोध न करता तो संपवला पाहिजे, असं स्टॅलिन यांचं मत आहे. थोडक्यात सनातन धर्म मानणाऱ्या देशातील ८० टक्के लोकसंख्येला संपवण्याची ते भाषा करत आहेत.”
“द्रमुक हा विरोधी पक्षातील प्रमुख तर काँग्रेसचा सहकारी पक्ष आहे. स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर मुंबईतील बैठकीत एकमत झालं होतं होतं का?” असा सवाल अमित मालवीय यांनी विचारला आहे.
हेही वाचा : “तुमच्या मुलाने क्रिकेटमध्ये किती धावा काढल्या?” तामिळनाडूतील मंत्र्याचा अमित शाहांना थेट सवाल
यावर प्रत्युत्तर देत उदयनिधी स्टॅलिन यांनी विधानावर ठाम असल्याचं सांगितलं आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं, “सनातन धर्माला मानणाऱ्यांना संपवण्याची भाषा मी केली नाही. माझ्या वक्तव्याबाबत कोणत्याही कायदेशीर गोष्टींना सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे.”