नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तसेच मनसे प्रमुखांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यात ठिकठिकाणी प्रचारसभाही घेतल्या होत्या. महायुती आणि मनसेचे लोकसभेला सूर जुळले होते, मात्र आता त्यांच्यात काही आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीवरून महायुती आणि मनसेत संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं होतं. हा संघर्ष अजूनही चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण विधान परिषदेच्या निवडणुकीत मनसे महायुतीबरोबर नाही. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या निवडणुकीबाबतची पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचे आदेश नसल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे. देशपांडे म्हणाले, “आमच्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याबाबत आम्हाला आदेश दिलेले नाहीत. आम्ही आमच्या विवेकाने मतदान करू.”
संदीप देशपांडे म्हणाले, “मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. मात्र, राज ठाकरे यांनी या निवडणुकित महायुतीला पाठिंबा देण्याचा आदेश दिलेला नाही. आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपापल्या विवेकाने मतदान करतील.”
कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसे नेते अभिजीत पानसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पानसे हे महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, महायुतीने ही जागा सोडण्यास नकार दिला. कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला असून भाजपाचे निरंजन डावखरे हे या मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी पुन्हा एकदा भाजपाने डावखरे यांनाच कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. परिणामी पानसे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. दरम्यान, आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मनसे महायुतीबरोबर नसल्याचं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.
हे ही वाचा >> Breaking : ४७ वर्षानंतर पार पडली लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक, भाजपाच्या ओम बिर्ला यांच्यावर दुसऱ्यांदा जबाबदारी
मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर मनसेने विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्याच मतदारसंघात (कोकण पदवीधर) उमेदवार दिल्यामुळे त्यांच्यातली युती फिस्कटल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर भाजपाने या मतदारसंघातून निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली. त्यापाठोपाठ मनसेच्या अभिजीत पानसे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा होऊन मनसेने उमेदवारी मागे घेतल्याचं बोललं जात होतं. मात्र मनसे या निवडणुकीत महायुतीबरोबर नसल्याचं स्पष्ट झालं आहे.