उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमध्ये मंत्री राहिलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाला रामराम करून समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. मात्र, त्यांची मुलगी आणि बदाऊच्या खासदार संघमित्रा मौर्य अजूनही भाजपामध्येच आहेत. एकाच घरातील बाप-लेक आता दोन वेगवेगळ्या पक्षात आहे. त्यामुळे खासदार संघमित्रा मौर्य सपामध्ये गेलेल्या वडिलांविरोधात भाजपाकडून प्रचार करणार का, अशी चर्चा सुरू होती. यावर संघमित्रा मौर्य यांनी स्वतःच प्रतिक्रिया दिली आहे.
संघमित्रा मौर्य म्हणाल्या की, “पंतप्रधान मोदी हे देखील माझ्या वडिलांसारखे आहेत. पण पक्षाने सांगितले तरी वडील स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात प्रचार करणार नाहीत,” एनडीटीव्हीशी बोलताना संघमित्रा मौर्य यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. पुढे त्या म्हणाल्या की, “मी भाजपासोबत आहे आणि राहीन. माझ्या वडिलांनी सपामध्ये जाण्यापूर्वी माझ्याशी कोणतीही चर्चा केली नाही. तसेच माझ्यावर भाजपा सोडण्याचा कोणताही दबाव नाही. कौटुंबिक जीवन आणि राजकीय जीवन पूर्णपणे वेगळे आहेत. मी संपूर्ण राज्यात भाजपाचा प्रचार करणार आहे. मात्र पक्षाच्या सांगण्यावरूनही मी वडिलांच्या विरोधात प्रचार करणार नाही, मला भाजपाच्या लोकांना निष्ठेचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही,” असं त्यांनी सांगितलं.
स्वामी प्रसाद मौर्य कुशीनगरच्या पडरौना मतदारसंघातून आमदार आहेत. स्वामी प्रसाद मौर्य यांनी नुकताच उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. २०१६ मध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांनी मायावतींचा बहुजन समाज पक्ष सोडला आणि २०१७ च्या यूपी निवडणुकीपूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला होता. २०१७ प्रमाणेच यावर्षी देखील ते ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपा सोडत समाजवादी पक्षात सामील झाले.