बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संजय जायसवाल यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर अॅलोपॅथीसंदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या बाबा रामदेव यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केलीय. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून संजय यांनी बाबा रामदेव यांना, “ते योगी नाहीत योगाचे कोका कोला आहेत” असंही म्हटलं आहे. पश्चिम चंपारणमधून अनेकदा खासदार राहिलेल्या जायसवाल यांनी अॅलोपॅथीच्या मुद्द्यावरुन डॉक्टरांच्या ‘भारतीय वैद्यकीय संघटना’ म्हणजेच आयएमए आणि बाबा रामदेव यांच्यात सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट लिहिली आहे.
नक्की वाचा >> “लस घेऊनही स्वतःला वाचवू शकले नाहीत, १००० मेलेत… हे कसले डॉक्टर”; रामदेव यांचे आणखीन एक वादग्रस्त विधान
“मागील काही दिवसांपासून एक विचित्र स्पर्धा सुरु असल्याचं मला दिसत आहे. प्रत्येक वायफळ गोष्टीवर उत्तर देण्याची काही गरज नसते. तुम्ही फार व्यक्त झाल्यास ज्या व्यक्तीला फार महत्व द्यायची गरज नसते त्याला महत्व देता. सध्या आयएमएसुद्धा हेच करत आहे,” असं म्हणत संजय यांनी बाबा रामदेव यांना फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं पोस्टच्या सुरुवातीलाच सांकेतिक शब्दांमध्ये म्हटलं आहे.
“बाबा रामदेव एक चांगले योगगुरु आहे मात्र ते योगी नाहीयत. योग अभ्यासाबद्दलच्या त्यांच्या ज्ञानासंदर्भात कोणीच प्रश्न उपस्थित करु शकत नाही. मात्र आपल्या मेंदूसहीत सर्व अवयवांवर नियंत्रण असणाऱ्या व्यक्तीला योगी म्हणतात. योग अभ्यास आयुष्यात खूप गरजेचा आहे कारण तो तुम्हाला निरोगी ठेवतो. पण योग काही चिकित्सा पद्धत नाहीय हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. हजारो वर्षांपासून आपल्याकडे उपचारांसाठी चरकसंहितेचा आणि सुश्रुतच्या शल्यक्रियेचा वापर करण्यात आला. हे कोण्या योगगुरुने केलेलं नाही,” असं संजय यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“बाबा रामदेव यांना मी मस्करीत योग शास्त्राचे कोका कोला आहेत असं म्हणतो. आपल्याकडे अनेक शतकांपासून शिकंजी आणि ठंडाईचा वापर शितपेय म्हणून करण्यात आला. आता घरोघरी कोका कोला आणि पेप्सीने स्थान मिळवलं आहे. तशाच प्रकारे भारतामध्ये हजारो वर्षांपासून योग अभ्यास करणारे लोक होऊन गेले. त्यांनी भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीमध्ये मूलभूत बदल घडवून आणले. मात्र योग अभ्यासाला घरोघरी पोहचवण्यातील बाबा रामदेव यांचं योगदान नकारता येणार नाही,” असं संजय यांनी म्हटलं आहे.
“मी आयएमएमधील माझ्या सर्व मित्रांना विनंती करतो की आपण फार महत्वाच्या नसणाऱ्या गोष्टींमध्ये स्पर्धा करुन आपली अनेक वर्षांचा साधना वाया घालवू नये. करोनाच्या लढाईमध्ये प्राण गमावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हीच खरी श्रद्धांजली असेल,” असंही संजय यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.