जनता दल युनायटेड (जेडीयू) पक्षाची आज राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत जेडीयूचे राज्यसभा खासदार संजय कुमार झा यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. खासदार संजय कुमार झा यांची जेडीयूच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी संजय कुमार झा यांना कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर जेडीयूच्या कार्याध्यक्षपदी संजय कुमार झा यांची निवड करण्यात आली.

केंद्रात असलेल्या एनडीए सरकारमध्ये जनता दल युनायटेड हा महत्वाचा पक्ष आहे. जनता दल युनायटेड पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होताना संजय झा यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं बोललं जातं. आता खासदार संजय कुमार झा यांच्यावर पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षाबरोबर चांगला समन्वय ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.

हेही वाचा : Video: “नवऱ्याला घरीच दारू प्यायला सांगा, त्यामुळे…”; भाजपाच्या मंत्र्यांचा महिलांना सल्ला!

आगामी बिहार विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खासदार संजय कुमार झा यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आल्याचं बोललं जात आहे. काही महिन्यांपूर्वीच संजय कुमार झा यांची राज्यसभेचे खासदार म्हणून वर्णी लागली होती. संजय कुमार झा यांच्या नियुक्तीवर बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी म्हणाले की, “त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाचा संपूर्ण भारतातील पाया विस्तारण्यास मदत होईल.”

दरम्यान, जनता दल युनायटेड (जेडीयू) पक्षाची आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे कार्यकारिणी सदस्य, सरचिटणीस, सचिव आणि प्रदेशाध्यक्षासह पक्षाचे सर्व खासदार आणि मंत्री उपस्थित होते. या बैठकीत काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या यशाचा आणि ज्या मतदारसंघात उमेदवारांचा पराभव झाला, यावर विचारमंथन करण्यात आले. तसेच २०२५ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रणनीती संदर्भातली विविध विषयांवर चर्चा झाली, असं सांगितलं जात आहे.