Sanjay Kumar Mishra ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाचे माजी प्रमुख संजय कुमार मिश्रा यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागारांच्या परिषदेत घेण्यात आलं आहे. आर्थिक सल्लागार परिषदेचे सचिव या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय कुमार मिश्रा हे १९८४ च्या बॅचचे उत्तर प्रदेश केडरचे आयएस अधिकारी आहेत.

२०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर सोडावं लागलं होतं पद

ईडीच्या संचालक या पदावर संजय कुमार मिश्रा यांना २०१८ मध्ये दोन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर सरकारने त्यांना अनेकदा मुदतवाढ दिली होती. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दणक्यानंतर मिश्रा यांना २०२३ मध्ये पद सोडावं लागलं होतं. मिश्रा ईडीचे संचालक असताना अनेक वजनदार नेत्यांवर ईडीची कारवाई झाली होती. तपास संस्थेने चार हजार प्रकरणं नोंदवली आणि ३ हजारांहून अधिक शोध मोहिमा केल्या होत्या. याच संजय कुमार मिश्रा यांना आता टीम मोदींच्या आर्थिक सल्लागारांच्या परिषदेत पूर्ण वेळ सदस्य करण्यात आलं आहे.

ईडी प्रमुख म्हणून संजय कुमार मिश्रा यांनी अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांची चौकशी केली. यामध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, विद्यमान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि पश्चिम बंगालचे माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांचा या चौकशीत समावेश आहे. त्यांच्या कार्यशैलीबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान त्यांना आर्थिक सल्लागारांच्या परिषदेत घेतल्यावर काँग्रेसने टीका केली आहे.

काँग्रेसची संजय कुमार मिश्रा यांच्याबाबत पोस्ट काय?

काँग्रेसने संजय कुमार मिश्रा यांच्यावर टीका करताना पातळी सोडली आहे. पाळीव प्राण्यांना निवृत्ती दिली जात नाही ते कायमच पे रोलवर असतात अशी खोचक टीका केरळ काँग्रेसने एक्स पोस्टवर केली आहे.

आर्थिक सल्लागार परिषदेत संजय कुमार मिश्रा यांना का घेण्यात आलं?

परिषदेचे माजी अध्यक्ष बिबेक देबरॉय यांच्या निधनानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. १ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होतं. मिश्रा यांच्या नियुक्तीमुळे आर्थिक धोरणे आणि प्रशासकीय कार्यक्षमतेबद्दल परिषदेला नवीन दृष्टीकोन मिळण्याची अपेक्षा आहे. भारत सरकारला, विशेषतः पंतप्रधानांना आर्थिक आणि संबंधित मुद्द्यांवर सल्ला देण्यासाठी EAC-PM ही एक स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात आली होती. सुमन बेरी (अध्यक्ष), संजीव सान्याल (सदस्य), शमिका रवी (सदस्य), राकेश मोहन (अर्धवेळ सदस्य), सज्जिद चिनॉय (अर्धवेळ सदस्य), नीलकंठ मिश्रा (अर्धवेळ सदस्य), नीलेश शाह (अर्धवेळ सदस्य), टीटी राम मोहन (अर्धवेळ सदस्य) आणि पूनम गुप्ता (अर्धवेळ सदस्य). हे याचे आत्ताचे सदस्य आहेत. या नावांमध्ये संजय कुमार मिश्रांच्या नावाचाही समावेश आहे.