Sanjay Kumar Verma on India-Canada Row : भारत आणि कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येनंतर मोठा वाद उद्भवला होता, जो अजूनही चालू आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाकडून सातत्याने केला जात होता. कॅनडाने आरोप केले असले तरी याप्रकरणी तिथलं जस्टिन ट्रुडो सरकार एकही पुरावा सादर करू शकलेलं नाही. दरम्यान, उभय देशांमधील वाद चिघळू लागल्यानंतर भारत सरकारने कॅनडामधील उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांच्यासह इतर राजनैतिक अधिकाऱ्यांना कॅनडातून बाहेर पडण्याचे आदेश दिले होते. ट्रुडो सरकारने निज्जरच्या हत्येचा संबंध भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांशी जोडल्यानंतर भारत सरकारने कडक पावलं उचलत कॅनडाला चोख उत्तर दिलं आहे. दरम्यान, संजय कुमार वर्मा यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर राजकीय फायद्यासाठी उभय देशांमधील संबंध बिघडवल्याचा आरोप केला आहे.

कॅनडामधील खासगी वृत्तवाहिनी सीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत संजय वर्मा म्हणाले, “निज्जरच्या हत्येप्रकरणी ट्रुडो यांनी भारतावर केवळ आरोप केले, मात्र ते याप्रकरणी एकही पुरावा सादर करू शकले नाहीत. त्यांनी केवळ गुप्त माहितीच्या आधारावर आरोप केले होते. तसेच त्यांनी स्वतःच मान्य केलं आहे की ते आरोप करत असले तरी त्यांच्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही. त्यांच्याकडे केवळ गुप्त माहिती असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. तुम्हाला दोन देशांमधील संबंध बिघडवायचे असतील तर, तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता. ट्रुडो यांनी नेमकं तेच केलं”.

हे ही वाचा >> Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू, अमित शाह यांनी दिला मोठा इशारा; म्हणाले, “कठोर प्रत्युत्तर…”

कॅनडातील फेडरल निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही संस्थांमधील परदेशी हस्तक्षेपाप्रकणी चौकशी समितीपुढे साक्ष देताना ट्रुडो म्हणाले होते, “होय आम्ही निज्जरच्या हत्येप्रकरणी भारतीय एजंट्सवर आरोप केले होते. आम्ही गुप्तहेर खात्याने सादर केलेल्या माहितीच्या आधारे ते आरोप केले होते. मात्र, त्यासाठी कोणताही ठोस पुरावा नव्हता”.

हे ही वाचा >> Yahya Sinwar : याह्या सिनवार बोगद्यात लपला होता, तर पत्नीकडे दिसली २७ लाखांची बॅग; इस्रायलकडून Video शेअर

काय म्हणाले संजय कुमार वर्मा?

दरम्यान, या मुलाखतीवेळी वृत्तनिवेदिकेने संजय वर्मा यांना विचारलं की निज्जरच्या हत्येशी तुमचा काही संबंध आहे का? त्यावर वर्मा म्हणाले, “अजिबात नाही. आमच्या त्या घटनेशी काडीमात्र संबंध नाही. तसेच कॅनडाने आरोप केलेत, मात्र त्यांनी पुरावा सादर केलेला नाही. हा आरोप राजकीय प्रेरणेतून केला गेला आहे”.

निज्जरची गेल्या वर्षी १८ जून रोजी ब्रिटिश कोलंबियाजवळच्या एका गुरद्वाऱ्याबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. निज्जरला भारत सरकारने दहशतवादी घोषित केलं होतं.