महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटाने गेल्या आठवड्यात त्यांची लोकसभेच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीनुसार काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघातही ठाकरे गटाने उमेदवार उभे केले आहेत. जागावाटपावरून महाविकास आघाडीत आधीपासूनच धुसफूस सुरू होती. परंतु, आता यादी जाहीर केल्यानंतर ही धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी आठवडाभरापूर्वी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वावर टीका केली आहे. त्याचबरोबर, शिवसेनेकडून (ठाकरे गट) मुंबईत काँग्रेसला दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोपही त्यांनी केला.
संजय निरुपम हे मुंबई उत्तर-पश्चिम म्हणजेच मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. २०१९ च्या निवडणुकीत गजानन कीर्तिकर यांनी त्यांचा पराभव केला होता. परंतु, गजानन किर्तीकर आता शिंदे गटात गेले आहेत, मात्र त्यांचे पूत्र अमोल कीर्तिकर मात्र ठाकरे गटातच आहेत. महाविकास आघाडीत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसध्ये रस्सीखेच चालू होती. परंतु, हा मतदारसंघ ठाकरे गटाने आपल्याकडे घेत अमोल कीर्तिकरांना येथून उमेदवारी दिली आहे. परिणामी निरुपमांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे निरुपम हे ठाकरे गटासह पक्षनेतृत्वावर संतापले आहेत.
निरुपम म्हणाले होते, “वरिष्ठ नेतृत्त्वांकडून माझी अपेक्षा होती की २०१९ ला निवडणूक हरल्यानंतरही मी मुबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात सक्रीय असल्यामुळे ते या जागेवर मला उमेदवारी देतील. कारण मला येथून निवडणूक लढवण्याचा मला अधिकार आहे. परंतु, शिवसेनेने आम्हाला दाबलं आणि आम्ही दबले गेलो आहोत. ठाकरे गटासारख्या जनाधार नसलेल्या पक्षासमोर काँग्रेसने झुकणं हा श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरू आहे असं वाटतंय. त्यामुळे मी काँग्रेसच्या नेतृत्त्वाला सांगू इच्छितो की येत्या आठवड्याभरात मी वाट पाहीन. माझ्यासमोर अनेक पर्याय खुले आहेत. आता जे काही होईल ते आरपार होईल. येत्या आठवड्याभरात याबाबत तुम्हाला घोषणा ऐकायला मिळेल. हायकमांडच्या मनात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांबाबत काय भावना आहेत त्या ऐकण्यासाठी एक आठवड्याची वाट पाहीन.”
हे ही वाचा >> शिंदे गटाला धक्का! शेवटच्या टप्प्यात हिंगोलीचा उमेदवार बदलण्याची नामुष्की; हेमंत पाटील यांचे तिकीट कापले
निरुपम यांनी काँग्रेस हायकमांडला इशारा देऊन एक आठवडा उलटला आहे. त्यामुळे निरुपम यांनी आज (३ एप्रल) पुन्हा एकदा एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून काँग्रेस हायकमांडला दिलेल्या अल्टिमेटमची आठवण करून दिली. तसेच ते म्हणाले, काँग्रेसने माझ्यावर अधिक ऊर्जा आणि स्टेशनरी (साधनसामग्री) वाया घालवू नये. त्याउलट त्यांची उरलीसुरली ऊर्जा आणि स्टेशनरी पक्ष वाचवण्यासाठी वापरावी. तसंही काँग्रेस पक्ष मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. मी पक्षाला एक आठवड्याचा अल्टिमेटम दिला होता. तो कालावधी आज संपतोय. उद्या मी स्वतः निर्णय घेईन.