Sanjay Nishad on Holi : उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आणि निषाद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय निषाद यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ते म्हणाले, “ज्या लोकांना होळीच्या रंगांचा त्रास होत असेल त्यांनी हा देश सोडून इथून निघून जावं. मुळात मुस्लीम समुदाय देखील रंगांपासून दूर नाही. त्यंच्याही घरात व आयुष्यात विविध रंग आहेत. ते देखील त्यांची घरं रंगवतात. पण काही लोक रंगांमध्ये विष कालवून समाजात अस्थिरता निर्माण करू पाहतायत.”
संजय निषाद यांनी यावेळी त्यांचा पक्ष, आगमी काळातील भूमिका व निवडणुकांवर भाष्य केलं. ते म्हणाले, “आमचा पक्ष निषाद समुदायाला एकत्र ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. आमचा पक्ष भाजपाबरोबर युतीत असला तरी आम्ही आमची ओळख कायम ठेवली आहे. आम्ही निषाद समुदायाच्या हितासाठी काम करत राहू. तसेच निषाद समुदायाचं समर्थन करणारी भारतीय जनता पार्टी मजबूत व्हावी यासाठी देखील आम्ही काम करत आहोत. समुदाय आमच्या बाजूने आहे. समाजात अस्थिरता पसरवणाऱ्या कोणत्याही रणनितीला आमचा समुदाय व उत्तर प्रदेशमधील जनता बळी पडणार नाही.
काही लोक समाजांमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत : संजय निषाद
यावर्षी धुलीवंदनाचा सण शुक्रवारी (१४ मार्च) साजरा केला जाणार आहे. मुस्लीम समुदाय शुक्रवारी (जुम्मा) मोठ्या संख्येने मशिदींमध्ये जाऊन सामूहिक नमाज पठण करतो. या दिवशी राज्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत संजय निषाद म्हणाले, “शुक्रवारी नमाज पठण करणारे लोक एकमेकांची गळाभेट घेतात. तसेच होळी साजरी करणारे लोकही गळाभेट घेतात. दोन्ही गळाभेट घेणे व आनंद साजरा करणारे उत्सवर आहेत. काही राजकारणी असे आहेत जे लोकांना एकत्र येऊ देत नाहीयेत. हे लोक समाजात विष कालवण्याचा प्रयत्न करतात.”
संजय निषाद म्हणाले, होळी व जुम्मा एका दिवशी आल्याने काहीजण यावरून वाद निर्माण करू पाहतायत. त्यांना माझा संदेश आहे की होळीच्या दिवशी आपण रंग उधळतो, एकमेकांना रंग लावतो आणि आनंद साजरा करतो. कोणीही या रंगात विष कालवण्याचा प्रयत्न करू नये.
होळीमुळे अर्थव्यवस्था सुधारते : संजय निषाद
निषाद पार्टीचे प्रमुख म्हणाले, “होळीमुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारते. त्यामुळे आपोआप सर्वांच्या घरी सुख व शांतीचं आगमन होतं. भारतीय संस्कारांनुसार सण हे आनंद साजरा करण्यासाठी असतात. सणांच्या निमत्ताने लोक आपसातील कटुता दूर करण्यासाठी पुढाकार घेतात, एकमेकांची गळाभेट घेतात. त्यामुळे ज्याला कोणाला रंगांची अडचण असेल त्यांनी केवळ त्यांचं घर नव्हे, तर हा देश सोडून निघून जावं.