Sanjay Raut alleges PM Modi of Putting Pressure on Naveen Patnaik : देशात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले वक्फ सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. तसेच संसदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विधेयकाविरोधात काँग्रेस आणि ‘एमआयएम’ पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधेयकाच्या वैधतेला दोन्ही पक्षांनी आव्हान देत त्यातून घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला आहे. यादरम्यान शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

संसदेत वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मदान केल्याच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर आरोप केले आहेत. वक्फ बोर्डाच्या दोन लाख कोटींच्या जमिनी सरकारला किंवा सरकारच्या लाडक्या उद्योगपतींना हव्या आहेत त्यामुळे हे विधेयक आणले आहे. आम्ही भ्रष्टाचार आणि भाजपाचे ढोंग याच्या विरोधात मतदान केले आहे, असे संजय राऊत म्हणाले. आमच्याकडे पक्षाचा आदेश मानला जातो, मोदी किंवा अमित शाह यांचा आदेश मानला जात नाही. शेवटच्या मिनिटापर्यंत महाराष्ट्र आणि दिल्लीतील भाजपाचे मोठे नेते विधेयकाला पाठिंबा द्या म्हणून आमच्या नेत्यांच्या संपर्कात होते, असा दावाही संजय राऊत यांनी यावेळी केला.

राज्यसभेत किंवा लोकसभेत मोठ्या बहुमताने विधेयक मंजूर झालेले नाही. ३०० पार केलेले नाहीये. २७३ चे बहुमत आहे आणि किती मते पडली हे एकदा तपासा. आमचे काही खासदार आजारी होते काही बाहेर होते अन्यथा आमचा आकडा आणखी वाढला असता, असेही संजय राऊत म्हणाले.

राज्यसभेत देखील हेच झालं. राज्यसभेत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटच्या मिनिटाला ओडिशाचे नेते नवीन पटनायक यांच्यावर खूप दबाव टाकला. त्यानंतर त्या सात जणांनी पलटी मारली, अन्यथा त्यांचा निर्णय ठाम होता. ते विधेयकाला विरोध करणारच होते. तुमच्याकडे इतकं बहुमत आहे तर मग शेवटच्या मिनिटापर्यंत हा काय खेळ सुरू होता? हा खेळ आमच्याबरोबर करण्याचा प्रयत्न झाला. पण आम्ही त्याला पाठिंबा दिला नाही, असे संजय राऊतांनी स्पष्ट केले.

लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ विधेयक मंजूर

राज्यसभेत गुरुवारी १२ तासांच्या वादळी चर्चेनंतर मध्यरात्री २.३० वाजता वक्फ विधेयक मंजूर करण्यात आले. राज्यसभेत १२८ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने, तर ९५ सदस्यांनी विरोधात मतदान केले. तत्पूर्वी लोकसभेत बुधवारी मध्यरात्री २८८ विरुद्ध २३२ मतांनी हे विधेयक संमत करण्यात आले. आता हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवले जाणार असून, मुर्मू यांनी विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.