नव्या वर्षात देशातल्या ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पाच राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड अशी राजकीयदृष्ट्या मोठी आणि महत्त्वाची राज्य देखील आहेत. त्यामुळे साहजिकच नव्या वर्षात राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळणार आहेत. त्याव्यतिरिक्त एरवीही राजकीय मंडळींकडून एकमेकांवर आरोप होतच असतात. त्यामुळे सामान्य नागरिक किंवा देशाचे मतदार यांच्यासमोर कुणावर विश्वास ठेवावा, असा पेच नक्कीच निर्माण होतो. याचसंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामान्य नागरिकांना एक सल्ला दिला आहे. या सल्ल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मोदी उत्तर प्रदेशात सभा घेतात आणि दिल्लीत येऊन…
संजय राऊत यांनी सामनामधील आपल्या रोखठोक या सदरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे. “मोदी उत्तर प्रदेशात सभा घेतात आणि दिल्लीत येऊन करोना, ओमायक्रॉनवर चिंता व्यक्त करतात. याला निर्बंध कसं म्हणायचं? निर्बंधांमुळए लोकांचा रोजगार, व्यवसाय बुडाला. त्यावर सरकारकडे २०२१ सालातली उपाययोजना नव्हती आणि २०२२मध्येही नसेल. मावळते वर्ष आणि नव्या वर्षात फरक करण्यासारखी परिस्थिती नाही”, असं राऊत म्हणाले आहेत.
कालिचरण प्रकरणावरून निशाणा!
दरम्यान, संजय राऊत यांनी कालीचरण आणि धर्मसंसद प्रकरणावरून देखील भाजपावर निशाणा साधला. “२०२१ सालात म. गांधींविरोधात घोषणा दिल्या, नथुराम गोडसेंचा धर्मसंसदेच्या नावाखाली जयजयकार केला. गांधींना शिव्या देणारे कुणी साधू कालिचरण हे महाराष्ट्रातले आहेत. भाजपानं या वृत्तीचा साधा निषेध केला नाही. ज्यांना गांधीजींवर हल्ले करणाऱ्यांचा विचार मान्य आहे, त्यांनी जगात जाऊन गांधी विचारांचा वारसा सांगू नये आणि गांधी जयंतीस त्यांच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक होण्याचे तरी ढोंग करू नये”, अशा शब्दांत राऊतांनी मोदींवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
“यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी करू नये”, संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा!
नव्या वर्षानिमित्त सामान्य लोकांना एकच विनंती…
संजय राऊतांनी आपल्या लेखातून देशातील सामान्य नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना विनंती केली आहे. “नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना सामान्य लोकांना एकच विनंती करायची आहे. झाले ते पुरे झाले. २०२२ सालात तरी शहाणे व्हा! नेते व मंत्री रोज खोटे बोलतात. त्यांचे इतके मनावर घेऊ नका. कारण शेवटी चुकीच्या माणसांना अंबारीत बसविण्याचे कार्य तुमच्याच हातून घडत असावे”, असं राऊत म्हणाले आहेत.
“घरच नाही तर…?” मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक सवाल!
“पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले ते नेहरूंच्या धोरणांमुळेच असं खापर फोडून मोदी व सरकार १२ कोटींच्या नव्या मर्सिडीज बेन्झ गाडीत विराजमान झालं आहे. मंत्र्यांच्या मोटारी, उद्योगपती-बड्या नेत्यांची चार्टर विमाने उडतच आहेत. आणि लोकांना मात्र उपदेशाचे डोस पाजले जात आहेत”, असं देखील राऊतांनी या लेखात म्हटलं आहे.