शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (६ एप्रिल) राज्यसभेत गुन्हेगारांच्या डिजीटल डाटा गोळा करण्याबाबतच्या विधेयकावर बोलताना मोदी सरकारवर हल्ला चढवला. संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव घेत “तुम्ही आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकता की कायद्याचा गैरवापर होणार नाही आणि होत नाहीये” असा सवाल केला.
संजय राऊत म्हणाले, “संविधानात म्हटलं आहे कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मर्जीविरूद्ध साक्ष देण्यासाठी बळजबरी केली जाऊ शकत नाही. कलम २० अनुसार प्रत्येक नागरिकाला न बोलण्याचा अधिकार आहे. त्याला कोणाही विरुद्ध साक्ष देण्यासाठी दबाव आणता येत नाही. नार्को ब्रेन मॅपिंग किंवा इतर कोणत्याही वैज्ञानिक चाचणी देखील केली जाऊ शकत नाही. त्यामुळेच २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नार्को टेस्टला बेकायदेशीर म्हटलं.”
हेही वाचा : पंतप्रधान मोदींसोबत काय चर्चा केली, बैठकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“तुम्ही आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकता का?”
“मी गृहमंत्री अमित शाह यांचा आभारी आहे. मी त्यांचं लोकसभेतील भाषण ऐकत होतो. त्यांनी म्हटलं की सरकार कायद्याचा दुरुपयोग होणार नाही यासाठी सर्व उपाययोजना करेल. त्यांनी गुन्हेगारांच्या डिजीटल ओळखीच्या कायद्याचा गैरवापर होणार नाही हे आश्वासन दिलं. मात्र, तुम्ही आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकता का की कायद्याचा गैरवापर होणार नाही आणि होत नाहीये? तुम्ही मला सांगा,” असा सवाल संजय राऊत यांनी अमित शाह यांना केला.