शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत हे सातत्याने ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्याची मागणी करत आहेत. राऊत यांनी शनिवारी (६ डिसेंबर) पुन्हा एकदा तीच मागणी लावून धरली. खासदार राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, देशातील जनतेच्या मनात मतदान पद्धतीविषयी, ईव्हीएमविषयी संशय आहे. ईव्हीएमचा विषय आता हळूहळू सगळीकडे पोहोचला आहे. ईडी आणि ईव्हीएमवर लोकांचा राग आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पश्चिम बंगालमधील ईडीच्या पथकावर जमावाने केलेल्या हल्ल्याचा दाखला देत संजय राऊत म्हणाले, ईडी आणि ईव्हीएमविषयी लोकांचा संताप उसळून येत आहे. उद्या ईव्हीएमच्या बाबतीत जनता रस्त्यावर उतरली आणि अराजक माजलं तर त्याला सरकार जबाबदार असेल. जगात सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशात आहे, असं म्हटलं जातं. परंतु, ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वासच नाही ती पद्धत चालवून तुम्ही कोणत्या प्रकारची लोकशाही या देशात लादू इच्छिता?

भारतीय जनता पार्टीला आव्हान देत संजय राऊत म्हणाले, तुम्हाला जनतेचा इतका प्रचंड पाठिंबा आहे असा तुम्ही दावा करता. हे भाजपाचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विष्णूचा १३ वा अवतार मानतात. मोदींमध्ये प्रभू श्रीरामांना घर देण्याची ताकद आहे, असं सांगतात, मग तुम्ही मतपत्रिकेवर निवडणूक घ्यायला का घाबरता? तुम्ही विष्णूचे १३ वे अवतार आहात ना? मग मतपत्रिकेवर निवडणूक घ्या. मोदींना मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यात कसली भीती? तुम्ही जर मतपत्रिकेवर निवडणूक घ्यायला घाबरत असाल तर याचा अर्थ तुम्हाला पराभवाची भीती आहे. तुम्हाला माहिती आहे मतपत्रिकेवर निवडणूक घेतली तर ३३ कोटी देवही तुम्हाला वाचवू शकणार नाहीत. श्रीरामही वाचवणार नाहीत.

हे ही वाचा >> योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला उत्तर प्रदेश पोलिसांकडून ठाण्यातून अटक, देवरिया हत्याकांडाशी कनेक्शन

खासदार राऊत म्हणाले, मतपत्रिकेवर निवडणुका होऊ लागल्या तर भाजपावाले ग्रामपंचायती आणि नगरपालिकेच्या निवडणुकाही जिंकू शकणार नाहीत, अशा प्रकारचं वातावरण या देशात तयार झालं आहे. या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राज्य नसून ईव्हीएमच्या माध्यमातून लादलेल्या हुकूमशाहीचं राज्य आहे हे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आपल्यासारख्या महाशक्तीमान राज्यकर्त्याने भीती न बाळगता मतपत्रिकेवर पुन्हा एकदा निवडणुका घ्यायला हव्यात. आजघडीला जगात कुठेही ईव्हीएमद्वारे निवडणूक घेतली जात नाही, अमेरिकेतही नाही, युरोपातल्या कुठल्या राष्ट्रात किंवा रशियातही नाही, मोदींच्या प्रिय इस्रायलमध्येही ईव्हीएमवर निवडणूक घेतली जात नाही. मग भारतात ईव्हीएमचा अट्टाहास का?

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut asks pm narendra modi why are you afraid to take voting on ballot paper asc