अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी ( १ फेब्रुवारी ) २०२३-२४ चा अर्थसंकल्प मांडला. मात्र, अर्थसंकल्पात महाराष्ट्रासह मुंबईसाठी तरतूद केली नसल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर घणाघात केला आहे. ‘अमृत काळ’ हा भाजपाच्या निवडणुकांसाठी असेल. हा पूर्ण निवडणुकीचा अर्थसंकल्प होता. जनतेच्या पैशातून २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका कशा लढल्या जातील यांचं उत्तर उदाहरण म्हणजे कालचा अर्थसंकल्प होता, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “मुंबईसह महाराष्ट्रातून सर्वाधिक महसूल देशाला मिळत असून, त्यातूनच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्या मुंबई आणि महाराष्ट्राला काय मिळालं? तर अर्थसंकल्पाआधी अर्थखात्यात दक्षिण ब्लॉगला बंद खोलीत हलवा करतात. तो चमचाभर हलवा सुद्धा मुंबईच्या हातावर मिळाला नाही,” असे टीकास्त्र संजय राऊतांनी सोडलं आहे.
हेही वाचा : “निवडणुकीची वेळ मारून नेण्यासाठी देशवासीयांना गुंगीचे औषध…”, अर्थसंकल्पावरून शिवसेनेचं भाजपावर टीकास्त्र!
“प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांच्या टोळधाडी…”
“गेल्या काही वर्षापासून मुंबई आणि महाराष्ट्राचं औद्योगिक आणि आर्थिक दृष्ट्या अध:पतन करण्याचं कारस्थान अर्थसंकल्पात पुन्हा दिसलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांच्या टोळधाडी मुंबईत येत आहेत. उपमुख्यमंत्री मोठ्या मोठ्या घोषणा करत आहेत. पण, मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या घोषणा होत आहेत,” असं संजय राऊतांनी सांगितलं.
हेही वाचा : “मंत्रीमंडळ विस्ताराबाबत स्पष्टता पाहिजे, कारण आमदारांमध्ये…”, बच्चू कडू यांचं मोठं विधान
“तरीही वाटण्याचा अक्षदा…”
“पंतप्रधान एका महिन्यात दोनदा मुंबईत येत आहेत. मात्र, येताना मुंबईसाठी काय आणत आणि देत आहेत. हा रहस्यमय विषय आहे. मुंबई महापालिका निवडणूक जिंकत शिवसेनेची सत्ता घालवून भविष्यात मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी आणि तुकडे करुन समाधान मिळत असेल, तर शक्य नाही. अर्थसंकल्पात मुंबईतील खासदारांच्या अनेक मागण्या होत्या. तरीही वाटण्याचा अक्षदा दाखवण्यात आला आहे. पण, आम्ही आवाज उठवत राहू,” असे संजय राऊतांनी म्हटलं आहे.