Sanjay Raut On Waqf Amendment Bill: वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत वरिष्ठ सभागृह राज्यसभेत आज दुपारपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भाजपा सरकार, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री रिजिजू आणि गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राऊत यांनी “कालपासून दोन्ही सभागृहांमध्ये गरीब मुस्लिमांबद्दल इतकी चिंता वाटू लागली आहे की, यामुळे केवळ मुस्लिमच नाही तर हिंदूही घाबरले आहेत,” असे म्हटले.

हिंदुत्वाचे नवे नवे मुल्ला होऊन…

दरम्यान संजय राऊत वक्फ विधेयकाबाबत बोलत असताना सत्ताधारी खासदार घोषणाबाजी करू लागले. सत्ताधाऱ्यांच्या या घोषणाबाजीला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले की, “तुम्ही मला काहीही शिकवू नका. मी खूप काही शिकून आलो आहे. तुम्ही चिंता करू नका. मी हिंदुत्त्वासहीत सर्वकाही शिकले आहे. तुम्ही हिंदुत्वाचे नवे नवे मुल्ला होऊन आला आहात. आमचा जन्मच हिदुत्त्वासाठी झाला आहे.”

गरीब मुस्लिम महिलांना…

यावेळी गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणाचा दाखला देत राऊत म्हणाले की, “गृहमंत्र्यांनी सांगितले आहे की, आम्ही मोकळ्या जमिनी विकून गरीब मुस्लिम महिलांना मदत करू. पण, अयोध्येत १३ हजार एकर जमिनीचा घोटाळा झाला आहे. केदारनाथमध्ये ३०० किलो सोने गायब झाले आहे. तुम्ही आमच्या हिंदूंच्या जमिनीचे रक्षण करू शकत नाही आणि मुस्लिमांच्या जमिनींचे रक्षण करण्याची भाषा बोलत आहात.”

बॅरिस्टर जिना यांचा आत्मा…

तत्पूर्वी वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, “मी सर्वांचे भाषण ऐकले. गृहमंत्र्यांचे भाषण ऐकले, कायदामंत्र्यांचे भाषण ऐकले, कालपासून तुम्ही लोक मुस्लिमांची बॅरिस्टर जिना यांच्यापेक्षा जास्त काळजी करत आहात. मला असंही वाटलं की जणू बॅरिस्टर जिना यांचा आत्मा त्यांच्या कबरीतून उठून तुमच्या शरीरात घुसला आहे. आधी आपण विचार करायचो की आपण एकत्र येऊन हिंदू राष्ट्र निर्माण करत आहोत, पण आता असे दिसते की तुम्ही हिंदू पाकिस्तान निर्माण करत आहात.”

Live Updates