एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाकडून घोषित करण्यात आलेली कार्यकारिणी ही असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले संजय राऊत

एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर जोरदार टीका केली. शिंदे गट हा फुटीर गट आहे. हा गट कार्यकारिणी घोषित करू शकत नाही. शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यांना शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्याचा अधिकार नाही. शिवसेना आजही भक्कमपणे उभी आहे, असे राऊत म्हणाले.

हेही वाचा – रामदास कदम व आनंद अडसूळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेनेचे नेतेपद बाळासाहेबांनी तयार केले आहे. तसेच शिवसेना हा नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना आमची कार्यकारिणी बरखास्त करण्याची अधिकार नाही. याचा सेनेवर फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी खासदारांच्या बंडाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. खासदार असे प्रयत्न करत असतील, तर कायद्याच्या पातळीवर त्याला आवाहन दिले जाईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच लोकसभेत आमचे मुख्य प्रतोद राजन विचारे असून शिंदे गटाकडून जो खासदारांचा आकडा देण्यात येत आहे, तो भ्रमीत करण्यासाठी आहे, असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा – “खासदार फुटणार याची कल्पना उद्धव ठाकरेंना होती,” शिवसेनेच्या बड्या नेत्याचे विधान

राज्य सरकार हे असंवैधानिक आहे. मुख्यमंत्र्यांवर आमदारकीची टांगती तलवार आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका ही कायद्याच्या कसोटीवर पक्की आहे. त्यामुळे त्यांच्या मनात भीती आहे, असे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सतत दिल्ली का यावे लागते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Story img Loader